अचलपूर मतदार संघात बळीराजा सन्मान योजना राबवा-राज्यमंत्री बच्चू कडू

चांदूरबाजार:अचलपूर मतदार संघातील पांदण रस्ते, वृक्षलागवड व नाला खोलीकरण या महत्त्वपूर्ण कामांचा, तीन महिन्यात अँक्शन प्लॅन तयार करून यातील सर्व कामे मार्गी लावा. बळीराजाच्या बळकटी साठी ही तिन्ही कामे महत्त्व पूर्ण आहेत. त्यासाठी अचलपूर मतदारसंघात बळीराजा सन्मान योजना तातडीने राबवा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत चांदूरबाजार व अचलपूच्या अधिकार्‍यांना दिले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. तर प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी संदीप अपार, स्थानिक तहसीलदार धीरज स्थूल, अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव प्रामुख्याने हजर होते. या आढावा बैठकीत अचलपूर मतदारसंघातील २६८ पांदण रस्त्यांच्या कामावर चर्चा करण्यात आली. यामध्ये अ गटातील ४२ कामे असून, यात ४३.५0 किलोमीटर पांदण रस्त्याचे काम केल्या जाणार आहे. तर ब गटातील १६८ कामांमध्ये २४३.४0 किलोमीटर पांदण रस्त्याचे काम होणार आहे. तसेच क गटातील ५६ पांदण रस्त्यांमध्ये १४४ किलोमीटर काम केले जाणार आहे. यात गाव जोडणारा, वस्ती जोडणारा प्रत्येक रस्त हा पांदण रस्त्या म्हणून तयार केलेल्या जाणार आहे. यामुळे अचलपूर मतदारसंघातील शेतकर्‍यांना, शेतात जाणे येणेसाठी सोयीचे होणार आहे. या बैठकीत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ई- क्लास जमिनीवर, फळझाडे लावून ग्रामपंचायत ला नवीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकतो. तसेच कालव्याच्या बांधावरसुद्धा झाडे लावण्यात यावी, असे आदेश राज्यमंत्री कडू यांनी या आढावा बैठकीत संबंधितांना दिले. यात ई-क्लास जागेत संत्रा, लिंबू, मोसंबी सीताफळ यासारखी फळ झाडे लावण्या बाबतचे नियोजन, करण्याच्याही सूचना राज्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच ‘जागा मिळेल तिथे वृक्ष, रास्ता असेल तिथे कुदळी’असा अतिरिक्त आराखडाही तयार ठेवण्याचा सूचना राज्यमंत्री कडू यांनी या बैठकीत सर्व संबंधीत विभागांना दिल्या. मतदारसंघात ११0 हेक्टर मध्ये ११ ते १२ हजार झाडे लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच मतदारसंघातील नाला खोलीकरण करण्याची कामे ही, या बैठकीत मंजूर करण्यात आलीत. तसेच बळीराजा सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायत ला आमदार निधीतून ७ लाख, ५ लाख, ३ लाख असे अनुक्रमे प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणाही सदर बैठकीत राज्यमंत्र्यांनी केली.तेव्हा हा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायत ने योग्य रीतीने राबवावा. याबाबतची माहिती गट विकास अधिकारी प्रफुल भोरगडे यांना, याबाबतची सूचनाही या बैठकीत देण्यात आली. तसेच मतदारसंघातील पहिल्या पांदण रस्त्याचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या आढावा बैठकीला विस्तार अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक, सा. बां. विभागाचे अभियंता मिलिंद भेंडे, दीपक भोंगाडे, संजय गोमकाळे, उमेश कपाले, अण्णा खापरेसह कर्मचारी उपस्थित होते.