चांदूरबाजार : निसर्गचे ऋतुचक्र आपल्या नियमांना कधीच चुकत नाही.निसर्ग प्रत्येक ऋतुत आपल्या अनोख्या छटांनी, मानवी मनाला आनंद देऊन जातो. त्यासाठीच प्रत्येक ऋतुंच्या बदलाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय संस्कृतीत, ऋतु निहाय सणांचे आयोजन करण्यात आले आहे. सणांचे निमित्ताने ऋतुचक्राचा आनंद व्दिगुनिक करण्याची संस्कृती, जगाच्या पाठीवर फक्त भारतीय धर्म रचनेतच आढळून येते. सध्याच्या वातावरणात पळस फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या पळस फुलांमुळे गाव खंड्यातच नव्हे तर दरी- कपारी, पर्वतांच्या रांगात, टेकट्यांवर, रस्त्यांलगतच्या झाडा झुडपात, होळी आधीच निसर्गांचा रंगोत्सवाला उधाण आल्याचा भास होतो. माघ आणि फाल्गुन हे दोन महिने उन्हाळ्याची चाहूल देणारे. या दोन महिन्यांतील माघ महिन्यात शिशिर ऋतूचा शेवट तर फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूच्या प्रारंभ. अशातच निसर्ग नियमानुसार,वृक्षांच्या पान गळीला सुरुवात झालेली असते. तर वातावरणात उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात झाली असते. यावेळी सर्वदूर वातावरणात शुष्कता निर्माण होऊन उदासता जाणवायला लागते. अशावेळी पळसाची केशरी फुले, कोरड्या व पानगळीच्या शुष्क वातावरणात मनातला प्रसन्नता देतात. शिशिर व वसंत या दोन्ही ऋतूत प्रवास करताना ही केशरी पळस फुले प्रवाशांना वेगळाच आनंद देतात. प्रवासादरम्यान वाहनांमधून दिसणारी ही धावती केशरी फुले पाहताना प्रत्येकाच्या मनात वेगळाच हर्षोल्हास निर्माण करतात. गाव खेड्यात बैलगाडीने प्रवास करतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली ही केशरी फुले, यामधून जाणार्या लांबच लांब रस्त्याने जाताना मनाला वेगळाच आनंद देतात. आयुर्वेदात या पळस फुलांचा व पानांचा औषध म्हणूनही उपयोग करतात. पूर्वी होळीच्या सणाला, याच फुलांच्या रंगांची उधळण केल्या जायची. कृत्रिम रंग आल्यानंतर या फुलांच्या नैसर्गिक रंगांचा वापर मागे पडला आहे. परंतु, आजही ग्रामीण भागात व आदिवासी पाड्यांमध्ये पळस फुलांच्या रंगानेच ‘रंगोत्सव’ साजरा केल्या जातो. साधारणत: ७0 च्या दशकापर्यंत रात्री पेटविलेल्या होळीच्या निखार्यावर दुसर्या दिवशी सकाळी हंड्यात पळस फुले पाण्यात उकळून त्याने मुलांना आंघोळ घातल्या जायची. कारण, या फुलांमध्ये चर्मरोग रोधक शक्ती असल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या शांतीसाठीही या फुलांचा वापर करतात. तसेच पळसांच्या पानांचा वापर पत्राळी व द्रोन करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातही केला जातो. सृष्टी सृजनासाठी वृक्षांना निसर्गत: च बहार येते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यानंतर पानगळी नंतर सर्व प्रथम,बहार येतो तो पळसाच्या वृक्षांनाच त्यानंतर होळी झाली की चैत्रा महिन्यात कडूनिंबाला नवती व बहार येतो. त्यानंतर अनेक वृक्षांना बहार येण्याची बिज धारणेची प्रक्रिया सुरू होते. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी किंवा वर्षा ऋतूच्या प्रारंभी वृक्षांची बिजे, जमिनीवर पडतात.त्यानंतर ही फळे पावसाळ्यात रूजून,नविन वृक्ष निर्माण व्हायला सुरुवात होते.अशा प्रकारे निसर्गाचा सृष्टी सृजनाचा सोहळा अखंड पुणे सुरू असतो.सृष्टी सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद,भारतिय संस्कृतीत वेगवेगळ्या सणांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.यासाठी यांची विभागणी सहा ऋतूत करण्यात आली आहे.
होळीपूर्वी निसर्गाच्या रंगोत्सवाला उधाण
Contents hide