हिमा दास

हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २000 मध्ये झाला. धावण्याच्या वेडाने तिला झपाटले होते आणि त्यातूनच ती एक धावपटू बनली. २0१८ मध्ये फिनलंडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेतीचे शेतकरी आहेत. ती एक भात शेतकर्‍याची मुलगी असून ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत होती. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. जुलै २0१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २0 वर्षांखालील जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली आहे. या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती प्रकाशझोतात आली त्याचे कारण मात्र वेगळे आहे. ती आता आसामच्या पोलिस दलात उपअधीक्षक होऊन देशाची सेवा करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आपले बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या प्रसंगी हिमाने सांगितले. माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्तीपत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते. डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते ते आता पूर्ण झाले आहे. हिमा दासचा आदर्श देशातील तरूण-तरुणींनी घेण्याची गरज आहे. हिमाने देशाला जिंकवले. आपल्या बापाला जिंकवत त्यांची जरी मान उंचावली तरी बरेच काही मिळवले असे म्हणता येईल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!