• Sat. Jun 3rd, 2023

सीताराम कुंटे

ByGaurav Prakashan

Mar 3, 2021

नुकतेच सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता. मात्र, राज्यातील काही अमराठी सचिवांच्या लॉबीचा प्रभाव मंत्रालयीन कामकाजात इतका मोठा आहे की, वर्ष, सव्वा वर्षानंतर कुंटे यांना मुख्य सचिवपद मिळाले. सुमारे २२ वर्षांपूर्वी कुंटे यांनी मुख्य सचिव कार्यालयात सहसचिवपदी काम केले होते. आता त्याच कार्यालयातून मुख्य सचिव म्हणून ते राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांत काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील १९८५च्या तुकडीचे कुंटे यांनी अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यानंतर एलएलबी केले. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर धुळ्याचे सहायक जिल्हाधिकारी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. २0१२ मध्ये ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण, अल्पबचत विभागाचे प्रधान सचिव, म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उच्च व तंत्र शिक्षण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. कुंटे यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांना विविध प्रशासकीय अडचणींमधून योग्य मार्ग दाखवल्याने मुख्यमंत्री त्यांच्यावर खूष होते. मुख्य सचिव म्हणून आपल्याच गटातील व्यक्तीची निवड व्हावी, म्हणून सगळ्याच पक्षांशी मधुर संबंध असलेल्या काही माजी सनदी अधिकार्‍यांनी यासाठी बरीच मोर्चेबांधणी केली होती. प्रवीण परदेशीही या स्पर्धेत होते. ते काही काळ प्रतिनियुक्तीवर संयुक्त राष्ट्रसंघात गेले होते. मुख्य सचिवपदी त्यांचेही नाव घेतले जात होते. मात्र, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विश्‍वासातले व प्रशासनातील विविध विभागांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कुंटे यांच्यावरच विश्‍वास दाखवल्याने मराठी भाषक अधिकारी वर्ग सुखावला आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झालेले सीताराम कुंटे हे १९८५ सालचे आयएएस अधिकारी आहेत. सीताराम कुंटे येत्या ९ महिन्यांपर्यंत राज्याचे मुख्य सचिवपदावर राहू शकतील, कारण नोव्हेंबर २0२१ मध्ये तेही सेवानवृत्त होणार आहेत. ते सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिन म्हणून काम पाहत होते. सीताराम कुंटे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही सेवा केली आहे. २0१२ ते २0१५ या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *