पुलगाव : येथील स्थानिक शिवाजी कॉलनीतील संदीप महेंद्रराव बिरे यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करून आग आटोक्यात आणल्याची घटना उघडकीस आली.
दिनांक २९ मार्चला रात्री १.३0 च्या दरम्यान जाग आल्यावर स्वाती बिरे यांना स्वयंपाक घरात प्रकाश दिसला. त्यांनी पती संदीप बिरे यांना उठविले. त्यांनी स्वयंपाक घरात डोकावले असता सिलेंडरने पेट घेतल्याचे दिसले.
प्रसंगावधान राखत त्यांनी स्वयंपाक घराचे दार व खिडक्या उघडल्या. सिलेंडरवर पाणी ओतून विझविले व ते घराबाहेर ढकलले. परंतु तोपयर्ंत स्वयंपाक घरातील वस्तू व बाजूच्या खोलीतील पडद्याने पेट घेतला होता. पेटलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. आगीने भडका पकडला. आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांनी घरातील विद्युत पुरवठा बंद करून मदत सुरू केली. आग आटोक्यात येत नसल्याने नगर परिषद अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. वाशिंग मशीन सह घरातील बरेच साहित्य जळून खाक झाले.
तातडीच्या मदतीने आग आटोक्यात आली. सुदैवाने बिरे दाम्पत्य व दोन मुलींना कोणतीही इजा झाली नाही. आग आटोक्यात आणण्याकरीता रवि पाठक, सुनिल बेलपांडे, गजानन धांदे, संतोष बैतुले यांनी मदत केली. सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक मंगेश झाडे यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
पुलगाव नगरपालिका अग्निशमन दलाचे निखिल आटे, कुणाल गणवीर, अजमिरे आदिंनी आग विजविण्यास प्रयत्न केले . तब्बल एक तासानंतर आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुलगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.
सिलेंडरच्या स्फोटाने घराला आग
Contents hide