• Sun. May 28th, 2023

सासरी कुणीही त्रास दिला तरी पतीच जबाबदार

ByGaurav Prakashan

Mar 10, 2021

नवी दिल्ली : सासरी महिलेला कुठल्याही नातेवाईकाने मारहाण झाली तर त्यात पतीच मुख्य आरोपी असेल असा निकाल सुप्रीम कोर्टाने देत पतीला जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणात पतीचे तिसरे तर महिलेचे दुसर लग्न होते. त्यांना २0१८ मध्ये एक मुलगा झाला. मागील वर्षी जूनमध्ये लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या लोकांविरोधात महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केली होती. हुंडा आणि आर्थिक कारणांवरून पती, सासरा आणि सासूने तिला मारहाण केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अंतरिम जामीन मिळण्यासाठी वकिलामार्फत वारंवार प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. त्यावेळी खंडपीठाने निकाल देताना सांगितले, तुम्ही कसले पुरुष आहात? तुम्ही गळा दाबून जीव घेत होता, असा तुमच्या पत्नीचा आरोप आहे. तुम्ही तिचा जबरदस्तीने गर्भपात केला आहे. कुठला पुरुष आपल्या पत्नीला क्रिकेटच्या बॅटने मारू शकतो? यावेळी संशयिताच्या वकिलाने सांगितले की, संबंधित महिलेच्या सासर्‍याने बॅटने मारहाण केली आहे, तेव्हा खंडपीठाने सांगितले की, यामुळे काही फरक पडत नाही. महिलेला सासरी त्रास होत असेल तर त्यासाठी पतीच जबाबदार असेल.
पंजाब आणि हरियाणा कोर्टाने पतीला जामीन दिला नाही. पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, १२ जून, २0२0 रोजी रात्री नऊ वाजता पती आणि त्याच्या वडिलांनी क्रिकेटच्या बॅटने जबर मारहाण केली. यात तिची सासूही सामील होती. पतीने तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर सासर्‍याने तोंडावर उशीने दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिले. याची माहिती मिळाल्यानंतर महिलेचे वडील आणि भाऊ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. वारंवार मारहाण होत असल्याने तिचा दोनवेळा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद केले होते. मेडिकल रिपोर्टमध्ये मारहाणीबाबत तथ्य आढळल्याने पतीचा जामीन अर्ज फेटाळला.

(Image Credit : Loksatta.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *