• Sun. May 28th, 2023

सण होळीचा….सप्तरंगांचा

    आला सण होळीचा
    उधळूया मिळूनी रंग
    गाऊ नाचू हसू सारे
    रंगातच होऊया दंग

आपल्या देशाला फार पूर्वीपासून सण सोहळ्यांची परंपरा आहे. सर्वांनी मिळून मिसळून सणांचा आनंद घेतला जावा यासाठी हे सणांचे प्रयोजन असते. सणांमुळे एकमेकांना भेटता येते. विचारांची देवाण-घेवाण होते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आणि नवीन वस्तुंची,कपड्यांची खरेदी केली जाते. नानाविध पदार्थ,पक्वान्न शिजविले,खाल्ले जातात. सग्या सोयऱ्यांना मिठाई वाटली जाते. पुरणपोळी,मोदक लाडू,बर्फी अशा गोडधोड पदार्थांची चंगळ असते. सणाला एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा, मिठाई दिली जाते.
होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला ‘होलिका उत्सव’ असेही म्हटले जाते. माघ महिना संपून फाल्गुन महिना लागताच ऋतुचा राजा म्हणजे वसंताचे आगमन होते. सर्व वृक्षांची जीर्ण , पिवळी झालेली पाने पडून नवीन पालवी फुटलेली असते. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. सर्व झाडे पानाफुलांनी बहरलेली, डवरलेली असतात. असे वाटते कडाक्‍याच्या थंडीने गारठलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरून, अलंकाराचा साज लेऊन नटून-थटून बसलेली आहे. आम्र वृक्षावर फुललेला मोहर आपल्या दरवळाने मोहित करत असतो. त्याच्यावर बसून कोकीळ आपल्या सखीला साद घालत असतो.
गावागावात देवांच्या यात्रा सुरू झालेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र आनंद पसरलेला असतो. बळीराजा देखील आपल्या सुगीचा हंगाम संपवून थोडा रेंगाळलेला असतो. चांगली सुगी झाल्याने त्याच्या खिशात पैसा खुळखुळत असतो. आपल्या भारतात प्रांत जरी वेगवेगळे असले तरी संस्कृती एकच असल्यामुळे प्रत्येक सण जोशात साजरा केला जातो. प्रत्येक सणाचे आपले असे काही वैशिष्ट्य असते. विविध प्रांतात तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. उत्तर प्रदेशात होळीचे फार महत्त्व आहे. होळी सणाला थंडीचा कडाका संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते थंडीने त्रासलेले प्राणी, झाडे, फुले आता जोशात असतात. सूर्याचे किरण सर्वांना आपल्या उब प्रकाशाने उल्हासित करत असतात. पानगळ होऊन खाली पडलेला पालापाचोळा एकत्र करून त्याची होळी करण्याची पद्धत परंपरेनुसार चालत आलेली आहे.उन्हाच्या कडाक्याने जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफा निघतात. सभोवताली पानांचा कुजलेला कचरा जमा झालेला असतो. तो आपल्या आरोग्यासाठी घातक असतो. म्हणून त्याची होळी करणे गरजेचे असते. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून ऋतुजा राजा वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो.
होळी हा सण महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. प्रत्येक ठिकाणी हा सण संध्याकाळीच साजरा केला जातो. महाराष्ट्रात भक्त प्रल्हादाची एक आख्यायिका सांगितली जाते.प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होऊन गेला. हिरण्यकश्यपू राक्षसाचा तो मुलगा.त्याने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला बरेच प्रकारे त्रास दिला. तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नसल्यामुळे त्याने आपली बहिण होलिका जिला अग्नीपासून भय नसल्याचा वर मिळाल्याने प्रल्हादला मांडीवर घेऊन ती होळीमध्ये बसली. परंतु आश्चर्य म्हणजे प्रल्हादला काहीही हानी झाली नाही. पण होलिका मात्र जळून मेली. थोडक्यात होळी पेटवल्यानंतर त्यामध्ये वाईट गोष्टींचे समर्पण केले जाते आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला जातो असे यातून सूचित करावयाचे असते.

अंगणात मध्यवर्ती ठिकाणी खड्डा खणून त्यामध्ये गोवऱ्या, लाकडे घालून होळी पेटवली जाते. होळीची खणानारळाने ओटी भरली जाते आणि तांब्यात पाणी घेऊन पाणी फिरवत तीन प्रदक्षिणा मारल्या जातात. आपल्या कुटुंबाच्या सुख,शांतीसाठी ते शुभ मानले जाते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. त्या होळीच्या जागेवर पाणी तापवतात व त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश असतो.दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.
मुले, बायका, पुरुष सर्वजण एकमेकांवर रंग उडवून आपला आनंद व्यक्त करत असतात. निरनिराळ्या ठिकाणी लोकं एकत्र येऊन गाणी, नृत्य करतात.सर्वत्र आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण असते.मौजमजेच्या गोष्टींना उधाण आलेले असते. वसंत ऋतुत विविध प्रकारच्या फुलांना बहर येतो.त्याचा रंग बनविण्यासाठी उपयोग केला जातो. उन्हाची तलखी कमी करण्यासाठी पिचकारीने आपल्या सवंगड्यांच्या वर पाणी टाकणे आणि फुलांपासून तयार केलेला रंग उधळणे असे त्याचे महत्त्व
आहे.
आला धुलिवंदनाचा सण

    उधळूया रंग आपण सारे
    भिजवूया या पिचकारीने
    आनंदाचे फैलावलेय वारे

अलीकडे मात्र या सणाला विकृत स्वरूप आलेले आहे. रंगांमध्ये रासायनिक रंग मिसळून त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात. चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे विकार वाढीस लागतात. पूर्वी फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, बीट अशा नैसर्गिक पदार्थ पासून रंग तयार केले जायचे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळत असे. लाल,पिवळा,निळ्या रंगाची उधळण करून मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो.यातून एकमेकाविषयीचा प्रेम,जिव्हाळा प्रतीत होत असतो. आपण एकमेकांच्या तोंडाला रंग लावत असताना त्याला आनंद प्राप्त होईल हे पाहायला हवे. मनातील वैरभाव आकस दूर करणारी, बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारी अशी होळी मनामनात प्रेमाची ज्योत पेटवत असते. एकीच्या भावनांनी आपला आनंद दुसऱ्याला वाटण्यासाठी सणांचे प्रयोजन असते.

    येता धुलिवंदनाचा सण
    करू नवरंगांची उधळण
    नाचू गाण्यांच्या तालावर

    घेऊ आनंद जसे बालपण
    सौ.भारती सावंत
    मुंबई
    9653445835

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *