• Fri. Jun 9th, 2023

संविधानातील मूल्यांचा स्वीकार करणारे महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन

ByGaurav Prakashan

Mar 10, 2021
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी दि.10 मार्च,2021 ला अमरावती येथे दोन दिवशीय ऑनलाईन राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाज सुधारणेसाठी व समाजाला नवी दिशा देण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 1873 रोजी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. सत्यशोधक समाजाच्या ज्या ग्रामाग्रामात सभा होत होत्या त्यावेळी जोतीरावांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई त्यांना साथ देत होत्या. या सत्यशोधक समाजात महात्मा फुले यांनी विविध जातीधर्माचे लोक एकत्र आणून समाजसुधारणेसाठी फार मोठे कार्य केेले. ही ‘सत्यशोधक समाज चळवळ’ अमरावती जिल्ह्यात गतिशील झाली होती. तत्कालीन अनेक सत्यशोधकांनी ही चळवळ ग्रामीण भागांमध्ये पोहचवून समाज परिवर्तन करण्याचा प्रयास केला. त्यापासून प्रेरणा घेऊन गेल्या 50 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वृत्तपत्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आणि कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय सत्यशोधक, दलितमित्र प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी वर्हाड विकास व उपेक्षित समाज महासंघाच्या वतीने सन 1992 पासून संविधानातील मूल्यांचा स्वीकार करणार्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले व आजही करीत आहेत. या संमेलनातून सत्यशोधकीय विचारवंत फुले-शाहू-आंबेडकरांच्या समग्र साहित्यावर विचारमंथन करून या थोरांच्या क्रांतिकारी विचारांचे बीजारोपण समाजामध्ये करतात.
महात्मा फुले यांनी 1885 सालातील 11 जून रोजी ग्रंथकार सभेस ठणकावून सांगितले होते की, “आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ”. आजची परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे की, सत्यशोधकीय, पुरोगामी व बुध्दिप्रामाण्यवादी विचारांवर प्रतिगामी विचारसरणीचा प्रभाव पडताना दिसत असल्यामुळे सत्यशोधकीय क्रांतिकारी विचारांचा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी आज महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. यासाठीच बौध्दिक विचारमंथनासाठी, बहुजन समाजाची वैचारिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सतत 50 वर्षापासून झटणारे प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या संयोजनामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी दि. 10 मार्च व 11 मार्च 2021 ला दोन दिवशीय ऑनलाईन बाराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सत्यशोधक विचारवंत प्रा. सतीश जामोदकर असून जनाधिकार पार्टीचे प्रदेश अध्यक्ष इंजि. वासुदेव चौधरी उद्घाटक आहेत. संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड बीज भाषणामध्ये संमेलनामागील भूमिका मांडणार आहेत. या संमेलनास “ महात्मा फुले यांचा शेतकर्यांचा आसूड व केंद्र सरकारचे कृषिविषयक धोरण” या विषयावर पहिला परिसंवाद तर “ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलाविषयक क्रांतिकार्य” या विषयावर दुसरा परिसंवाद आहे. माझ्या अध्यक्षतेत परिवर्तनवादी कविसंमेलन असून एकपात्री नाट्यप्रयोग व ठराव वाचनाने संमेलनाचे सूप वाजणार आहे.

महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारधारेची पेरणी फुले-शाहू-आंबेडकरांनी केली. या थोर पुरूषांचे साहित्य मराठी साहित्याला फार मोठ्या उंचीवर नेणारे असून त्यांच्या साहित्यातील वैचारिक वादळ हे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अशाप्रकारचे सत्यशोधकीय साहित्य संमेलनं आज काळाची गरज आहे. कारण हे साहित्य समाजपरिवर्तनाच्या मूल्यांना भरपूर बळ देणारे आहे. विधवा, स्त्रिया, कामगार, शेतकरी आणि वंचितांना अन्यायाविरूध्द क्रांतीची मशाल करांमध्ये घेऊन लढण्यास प्रवृत्त करणारे हे क्रांतिकारी साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अशाप्रकारच्या परिवर्तनवादी सत्यशोधक साहित्य संमेलनातून पूर्ण होत असते. हाच उद्देश समोर ठेऊन या म. फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील संपूर्ण कार्यक्रमांची रूपरेषा संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ठरवित असतात. हे आजपर्यंत जे अकरा साहित्य संमेलनं झालेली आहेत त्यातील अध्यक्षीय भाषणे, परिसंवादाचे परिवर्तनवादी विषय व त्या विषयांची मांडणी करणारे क्रांतिकारी वक्ते तथा परिवर्तनवादी कविसंमेलनातील क्रांतिकारी वैचारिक कविता हे सर्व लक्षात घेतले तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्यास ही महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनं यशस्वी ठरलेली आहेत, असे म्हणता येईल.
समान्य जनतेचे संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क अबाधित राहण्यासाठी सत्यशोधकीय विचारांनीच परिपूर्ण आधार दिला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या सत्यशोधकीय साहित्य विचारांनी विषमतेविरूध्द विद्रोह करण्याचे बळ दिले. माणसाला एकमेकांशी जोडण्याची मानवता धर्माची शिकवण दिली. आधुनिक काळातील मूलभूत साहित्यप्रवाह म्हणून महात्मा फुले यांचा सत्यशोधकीय साहित्यप्रवाह ओळखल्या जातो. विषमताधिष्ठित मूल्यांना टक्कर देणारा हा विचार प्रवाह संविधानातील मूल्यांचा स्वीकार करणारा आणि शोषणमुक्त समाजनिर्मिती करणारा आहे, सत्यशोधक चळवळीच्या ध्येयापर्यंत पोहोचविणारा आहे. या ध्येयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातून पूर्ण होईल, ही आशा.
या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनासोड, जनसंपर्क अधिकारी श्री प्रभाकर वानखडे, समन्वयक श्री नाना रमतकार व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि यशस्वीतेसाठी या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील विचारमंथन समग्र समाजपरिवर्तनचा मार्ग ठरो, ही सदिच्छा व्यक्त करतो.

    महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

    कवी -लेखक-वक्ता

    प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
    रुक्मिनी नगर, अमरावती
    भ्र.ध्व. 8087748609

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *