• Sun. May 28th, 2023

संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचा नंबर?

ByGaurav Prakashan

Mar 2, 2021

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा नंबर धनंजय मुंडे यांचा लागणार का? हा प्रश्न कळीचा ठरला आहे. धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून होऊ लागली असून धनंजय यांच्या भगिनी व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीच या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांचा राजीनामा घेतला गेला यात आम्हाला पडायचे नसून राठोड आता मंत्रिपदावर नाहीत ही महत्त्वाची बाब आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी आमची मागणी असून मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष ठेवावे, ही अपेक्षा असल्याचे पंकजा यांनी नमूद केले. त्यानंतर पंकजा यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसाच करुणा शर्मा आणि रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पुन्हा एकदा पंकजा यांनी केली. धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही पंकजा यांनी केले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आमचा पक्ष सातत्याने करत असून माझेही तेच मत असल्याचेही पंकजा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. पोलिस यंत्रणांवरील दबावाकडे बोट दाखवत पंकजा यांनी यावेळी महत्त्वाची मागणी केली. राजकारणात वावरत असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी यंत्रणा असायला हवी. तशी स्पष्ट गरज सध्या दिसत आहे, असे पंकजा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *