• Fri. Jun 9th, 2023

”शिमगा’’ अन ‘धुयमाती ‘खेळा..! पण जरा सांभाळूनच..!’

ByGaurav Prakashan

Mar 14, 2021

होळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वसंत ऋतूमधील हा आनंद आणि उत्साहाचा तसेच निसर्गाची बदलनारी अवस्था सुचवणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने सुध्दा ओळखला जातो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना जाळून राख करावे या गोष्टीचे प्रतिक आहे. या सणाला पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते, तर दुसर्‍या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुलिवंदन केले जाते.
शहरात प्रत्येक मोहल्ल्यात तसेच खेड्यापाड्यात ह्या सणाच्या निमित्ताने मोठमोठ्या होळ्यांची चढाओढ दिसुन येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. पर्यायाने वृक्षतोड होते, बरेचदा हिरवी झाडे सुध्दा तोडली जातात. काही ठिकाणी जंगलाना आगिसुध्दा लावल्या जातात. त्यामुळे वनस्पती व वन्यजिवाचे नुकसान होते. हवा दुषित होते.
संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या शब्दात वनाचे महत्त्व सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा आपल्या आज्ञापत्रातून कोणीही वृक्षतोड करु नये. अशा आज्ञा दिल्या होत्या मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभुत गरजा वृक्षच पुर्ण करीत असतात. वृक्ष म्हणजे प्राणवायू निर्मितीचा कारखाना आहे. अन्न पाण्यावाचून आपण काही दिवस जीवंत राहू शकतो पण हवे शिवाय ५ मिनिटे सुध्दा जिवंत राहू शकत नाही. वृक्षामुळे आपल्याला फुले, फळे, वनौषधी मिळते. दरवाजे, खिडक्या, टेबल, खुर्च्या या सारखे फर्निचर मिळते. वृक्षाचे फायदे असुनही आपण झाडावर करवत चालवतो. झाडावर कुर्‍हाड चालवून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. वास्तविक पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने ३३ टक्के जमीन जंगलाखाली असणे आवश्यक आहे आपल्या देशात हे प्रमाण फक्त १२ ते १३ टक्यावर आलेले आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक आहे .

वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि सद्य परिस्थितीत होत असलेली वृक्षतोड पाहता, होळीत लाकडाचा कमीतकमी वापर करावा. त्यासाठी ‘एक गाव एक होळी’ ही कल्पना चांगली आहे. प्रतिकात्मक होळी करणे फारच उत्तम. महाविद्यालयीन सेवेत असताना मी राष्ट्रीय हरित सेनेमार्फत अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविले. जसे कचऱ्याची होळी, भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचे पुतळे करून जाळणे, आपल्यातील एखादा दुर्गुण कागदावर लिहून ते होळीत जाळणे यासारखे.
आज आपल्या देशाची लोकसंख्या 136 कोटीच्या पुढे गेली आहे. कोट्यावधी लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. कुपोषणाची समस्या अतिशय गंभीर आहे. यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. अशावेळी केवळ होळीचा मान म्हणून आपण होळीत पुरणपोळ्या टाकत असतो. त्यापेक्षा गोरगरीबांना दिल्यास ते पुण्याचेच काम होईल.
धुळवडीच्या दिवशी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. ग्रामीण भागात आजही जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मैलोगणतीची पायपीट करावी लागते. देशातील भिषण पाणीटंचाई आणि सातत्याने कमी होत असलेल्या जलसाठ्याचे भान ठेऊन धुळवडीत होणारी पाण्याची नासाडी थांबविली पाहिजे.
पुर्वीच्या काळी धुळवडीच्या दिवशी नैसर्गीक रंगाचा वापर केला जाई. या काळात अनेक वृक्षांना फुलांचा बहर येतो. त्यापासून हे रंग बनवलेले असायचे. आम्ही लहान असताना पळसफुलाच्या (केसूला) रंगाने होळी खेळायचो. हे नैसर्गिक रंग आरोग्यासाठी अजिबात अपायकारक नसायचे.

पण आज मात्र एखाद्याला होळीच्या राखेत घोळसणे, गटारात टाकणे यासारखे प्रकार दिसून येतात. शेण वा चिखलाचा सुद्धा वापर होतो मला आठवते सत्तरच्या दशकात करजगावात चिखलाची होळी खेळताना रामहरी तवकार यांना आपले समोरचे पाच सहा दात गमवावे लागले होते. म्हणून शेण चिखलाचा वापर सुद्धा ठिक नाही.
आजकाल नैसर्गिक रंगांची जागा कृत्रिम रासायनिक रंगाने घेतली आहे. बाजारात ते सहजपणे उपलब्ध होतात. त्यातील विषारी घटकाचे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात. आपल्याला त्याची अजिबात जाणिव नसते. तरीही धुळवडीच्या दिवशी आपण त्याचा सर्रास वापर करीत असतो.

रंग- रसायन – आरोग्यावरील परिणाम

काळा – आॅक्साईड- मूत्र संस्थेचे कार्य बंद पडणे

हिरवा – कॉपर सल्फेट – डोळ्यांना अलर्जी, तात्पुते आंधळेपण

चंदेरी – अॅल्यूमिनिम ब्रोनाईड – कॅन्सर

निळा – पर्शियन नीळ- त्वचेचे आजार

लाल – मक्युरी सल्फाईड – अति विषारी/ त्वचेचा कॅन्सर

रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता आपण नैसर्गिक रंग वापरणे अधिक चांगले काही नैसर्गिक रंग आपणास पुढीलप्रमाणे तयार करता येतील.

जांबळा– हा रंग आपल्याला ला बीटच्या गरापासून तयार करता येईल. बीटचागार पाण्यात टाकून ढवळले असता आकर्षक जब्भ्ला रंग तयार होतो.

पिवळा – हा रंग हळदीपासून तयार करता येतो. झेंडूची फुले तसेच बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळली तर आकर्षक पिवळा रंग तयार होतो.

काळा – आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर टाकून उकळले असता गडद काळा रंग तयार होतो.

लाल – लाल रंग जास्वंद पळफुल, काटेसावर यांच्या फुलांचा लगदा पाण्यात टाकून ढवळला असता आकर्षक लाल रंग तयार होतो.

हिरवा – पालक किंवा कोणत्याही हिरव्या पानाचा कुटून लगदा करून पाण्यात ढवळला असता आकर्षक हिरवा रंग तयार होतो.

नारंगी – मेंदीच्या वाळलेल्या किंवा हिरव्या पानापासून नारंगी रंग तयार करता येईल.

तेव्हा या वर्षीचा ‘शिमगा’ आपण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करू या! घरच्या घरीच नैसर्गिक रंग तयार करून ‘धुयमाती’खेळू या! आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करु या..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *