• Fri. Jun 9th, 2023

वीज पुरवठा तोडण्यास स्थगिती -अजित पवार

ByGaurav Prakashan

Mar 3, 2021

मुंबई : विधानसभेच्या सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.
कोरोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्दय़ावरून सभागृहात गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्दय़ावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली होती.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर आंदोलन केले. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपाने या मुद्दय़ाकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.

वाढीव वीज बिल मुद्दय़ांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपयर्ंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्दय़ावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणे थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्दय़ावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतूून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी वीज कनेक्शन तोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले, अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *