• Sun. May 28th, 2023

लॉकडाऊनमध्ये १0 हजार कंपन्या बंद

ByGaurav Prakashan

Mar 10, 2021

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या. देशामध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एप्रिल २0२0 ते फेब्रुवारी २0२१ या १0 महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकडेवारी असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठे कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउन असल्याचे सांगण्यात येत आहे.
कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आकडेवारी संदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणार्‍या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपयर्ंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २0१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १0 हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत.
सोमवारी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. वर्ष २0२0-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २0१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १0 हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ३९४ कंपन्या बंद पडल्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू (१३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा अव्वल पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येक ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४0४ कंपन्या, केरळमध्ये ३0७ कंपन्या बंद पडल्या आहेत. याचप्रमाणे झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १0४ कंपन्यांना एप्रिल २0२0 ते फेब्रुवारी २0२१ या कालावधीमध्ये टाळे लागले. इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश मेघालयमध्ये ८८, ओदिशामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्‍चिम बंगालमध्ये चार तर अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *