लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय

मुंबई: कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे काही शहरांमध्ये निर्बंध लादले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी बातमी दिली आहे. राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जतनेला सावधानतेचा इशारा दिला आहे. लॉकडाऊनसोबतच उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन जनतेने करावे असे आवाहन केले आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही हे सांगताना जनतेने काय काळजी घ्यावी यासंदर्भातील इशाराला दिला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज लागू शकते, असेही उद्धव म्हणाले आहेत.
गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये उद्धव यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील जनतेला लसीसंदर्भात मनात कोणताही संभ्रम न ठेवता लस टोचून घेण्याचे आवाहन केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी, मी विनंती करतो की जे पात्र आहेत त्यांनी लसीकरण करुन घ्यावे आणि सर्वाजनिक ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात धुणे हे नियम पाळावे लागतील. आपल्याला कदाचित पाहिल्यापासून सुरुवात करावी लागले. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये असे वाटत असेल तर ही बंधने पाळणे अत्यावश्यक आहे, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे यांनी, काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील निबर्ंध कठोर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आठवडा बाजार बंद करण्यात आलेत तर काही ठिकाणी शनिवार रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र लवकरच लॉकडाउनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होईल अशी शक्यता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!