राज्यात वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती 30 जूनपर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरिता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.राज्यातील ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणार्‍या एकूण ऑक्सिजनपैकी 80 टक्के वैद्यकीय वापराकरिता तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरिता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा, असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!