• Mon. Jun 5th, 2023

राजकीय हस्तक्षेपाला कंटाळूनच ‘त्या’ कुलगुरुंचा राजीनामा

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021

मुंबई : जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणरेच्या कुलगुरुंनी राजीनामा दिला आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या राजकीय हस्तक्षेपाला कंटाळूनच त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करण्यात येत आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांनी विद्यापीठ स्वायत्तेवर गदा आणणारे काही निर्णय घेतल्यामुळे व कुलगुरू महोदयांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करून ढवळाढवळ केल्यामुळे ही वेळ आज महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात आली आहे, असे स्पष्ट मत अभाविपने मांडले आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कामकाजात शासकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आक्षेप शिक्षण वतरुळात सातत्याने घेण्यात येत आहे. विद्यापीठातील कामे, कंत्राटे यांबाबत मंत्रालयातून येणार्‍या सूचनांच्या कथा सर्वच विद्यापीठांमध्ये चर्चेत आहेत. राज्यातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा देण्यामागेही वाढता शासकीय हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गेले अनेक दिवस राज्य शासन विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहे. परीक्षा घ्याव्यात की नाही? आपत्कालीन परिस्थितीमध्ये परीक्षा पद्धती कशी असावी? विद्यापीठाच्या खर्चातून जनता दरबार भरवणे, मुंबई विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या कुलसचिव नियुक्तीसंदर्भात केलेला हस्तक्षेप व त्यानंतर न्यायालयाने राज्यशासनाला दिलेली चपराक हे प्रकरण ताजे आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विद्यापीठांच्या कामकाजात राजकीय हेतूने प्रेरित होऊन करत असलेल्या हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामा दिला, ही शिक्षण क्षेत्रासाठी दुर्दैवी घटना असल्याचे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञानी या विरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *