• Wed. Jun 7th, 2023

म्हशींनी भरलेला भरधाव ट्रक उड्डाणपुलाला धडकला

ByGaurav Prakashan

Mar 6, 2021

अमरावती ; छिंदवाडा येथून ३३ म्हशी घेऊन अमरावती कडे भरधाव जाणारा ट्रक उड्डाणपूलाला धडकल्याने झालेल्या जबर अपघातात ८ म्हशी जागीच ठार झाल्या तर २५ म्हशी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर चालक वाहक घटनास्थळावरून फरार झाले असून क्लिनर वाहनात अडकल्याने त्याला पोलिसांनी बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सकाळी सात वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. घटनेची हकीकत अशी की, ट्रक क्र.यूपी १२ बी.टी.२४५१ छिंदवाडा येथून ३३ म्हशी घेऊन अमरावती कडे जात असतांना सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उड्डाणपूलाखालून अमरावती मार्गावर येण्यासाठी भरधाव निघाला असता उड्डाणपूलाच्या भिंतीला ट्रक ची जोरदार धडक लागली. धडक एवढी भीषण होती की ट्रक महामार्गाच्या विरुद्ध दिशेने थेट मेजवानी हॉटेलनजीक येउन धडकला. या घटनेत ८ म्हशी जागीच ठार झाल्या तर अन्य म्हशी जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या गोरक्षण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर चालक वाहक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर सादिक नामक क्लिनर हा वाहनात अडकल्याने पोलीस निरीक्षक कुरळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्यांनी सादिक ला बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही तासासाठी ठप्प झाली होती.क्रेन च्या साहाय्याने दगावलेल्या म्हशींना इतरत्र हलवून त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.नांदगांव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *