अमरावती : अमरावती महानगरपालिकेकडे यंदाचा मालमत्ताकर जमा करावयाची अंतिम तारीख ३१ मार्च २0२१ ही आहे. ३१ मार्च २0२१ रोजी मालमत्ता कर भरावयाच्या या शेवटच्या दिवशी मालमत्ता कराचा भरणा नागरिकांनी करावा. यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी जमा झालेली एकूण रक्कम ही रुपये २९ कोटी ३८ लाख २७ हजार ९८५ इतकी झाली आहे. यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे रुपये ४७ कोटी ८१ लाख ६६ हजार 0८४ लक्ष्य असून, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे हे मालमत्ता कर वसुलीच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेत असून त्यांच्या मार्गदर्शनात याबाबत सूक्ष्मस्तरीय नियोजन व अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे.अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे अव्याहतपणे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येत असतात. या सेवा-सुविधा नियमितपणे देण्यामध्ये नागरिकांकडून कर रुपात गोळा होणा-या महसुलाची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत जमा करावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वारंवार विनंती व सूचना करण्यात येत असतात. मात्र, असे प्रयत्न करुनही वेळेत मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांवर दरमहा आवर्ती दराने शिल्लक रकमेवर २ टक्के दंडाची आकारणी देखील केली जाते. तर त्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांबाबत संबंधित दंडात्मलक कारवाई केली जाते. तर त्यापुढील टप्प्यात चल संपत्ती जप्त करण्याची, अटकावणीची कारवाई देखील करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.