• Sun. May 28th, 2023

महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक ‘सीएसएमटी’

ByGaurav Prakashan

Mar 5, 2021

मुंबई : महाराष्ट्रातील पहिले हरित स्थानक म्हणून मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बहुमान मिळाला. भारतीय उद्योग संघटनेच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलिंगच्या रेटिंगनुसार हा बहुमान देण्यात आला. आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंह अरोरा यांच्याकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
मध्य रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रात विविध हरित उपक्रम राबविले आहेत. ज्यात वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्रे तयार करणे, सौर पॅनेल बसविणे, अनेक स्थानकांवर ग्राहक अनुकूल उपक्रम राबविणे, पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकीच्या चाजिर्ंगची व्यवस्था करणे, या सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा १५ टक्के परिसर झाडांनी व्यापला आहे. त्यामुळे, स्थानक परिसर स्वच्छ हिरवागार दिसत आहे. एलईडी लाईट, सौर ऊर्जा, पाण्याची बचत करणारे उपक्रम यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील हरित स्थानक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती आयजीबीसीच्या अधिकार्‍यांनी दिली.

हरित उपक्रम राबविण्याच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांसाठी रेल्वे कर्मचारी व अधिकार्‍यांचे कौतुक आहेच. त्यांना मध्य रेल्वे क्षेत्रांमध्ये अशा उपाययोजना करण्यास नेहमीच प्रोत्साहित केले जाते. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुवर्ण प्रमाणपत्र देऊन रेल्वेच्या प्रयत्नला मान्यता दिल्याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आयजीबीसीच्या टीमचे आभार मानले.
वाय-फाय, स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे, पर्यटन माहिती व बुकिंग सेंटर, फुड कोर्ट, औषध आणि वैद्यकीय सुविधा इत्यादी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वे स्थानकावर प्लास्टिक बंदीकरिता रेल्वेकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, असे लिहिलेले फलक आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या एक पर्यावरणीय परिणामावर जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल डिस्प्ले प्रदर्शित केलेले आहे. त्यामुळे, रेल्वेस्थानकावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झालेला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

(Image Credit : Lokmat)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *