अमरावती : ग्रामीण परिसरातील गरीब कुटुंबांचे हक्काचे घर पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यात महाआवास योजना राबवली जात आहे. मंजूर घरकुलधारक नागरिकांना उत्तम दर्जाचे बांधकाम साहित्य रास्त भावात उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाकडून बचत गटांच्या सहकार्याने ठिकठिकाणी ‘घरकुल मार्ट’ सुरु करण्यात आले असून, घरकुलधारकांना एकाच ठिकाणी बांधकाम साहित्य उपलब्ध होणार आहे.
आवास योजनेत अनेकदा शासकीय लाभ मिळूनही घर बांधकामासाठी उत्तम साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक घराचे बांधकाम रखडते. त्यामुळे गरजूंचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होतो. हे लक्षात घेऊन उमेद अभियानातील समूह, ग्रामसंघाद्वारे गावामध्येच घरकुल बांधकाम साहित्य उपलब्ध करून देत आहे. यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात घरकुल मार्टमधून साहित्य मिळाल्याने घरकुल बांधकामास गती मिळत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.
घरकुल मार्टच्या माध्यमातून विटा, सिमेंट, गिट्टी, लोखंड, वाळू, टिनपत्रे, शौचालय शीट, दरवाजाची फ्रेम, खिडकी असे अत्यावश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. घरकुल मार्टद्वारे अल्प नफा घेऊन साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचीही सोय झाली असून, घराचे बांधकाम करण्याबाबत उत्साह दिसून येत आहे, अशी माहिती उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी दिली.
नाममात्र नफा घेऊन चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून दिल्याने गरजूंना हक्काचे घर मिळण्यास व बचत गटांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी उमेद अभियानाच्या घरकुल मार्ट उपक्रमाचा लाभ होत आहे.
महाआवास योजनेला आता उमेद अभियानाच्या ‘घरकुलमार्ट’ची साथ
Contents hide