• Tue. Jun 6th, 2023

भानखेडा परिसरातील 33 हजार कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021

अमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे 33 हजार 500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी 90 रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परीघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये भानखेड परिसरातील श्री. गोळे व श्री.मेश्राम यांच्या फार्मवरील एकूण 33 हजार 500 कोंबड्या आज खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

उपविभागीय अधिकारी श्री. राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक आयुक्त डॉ. कावरे, डॉ. अवघड, डॉ. पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुटपक्ष्यांना दयामरण देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी सुमारे दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असलेली 32 पथके तैनात करण्यात आली होती.
संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्र कृती दलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या. वाहीत सतिश गोळे यांच्या पोल्ट्री फार्ममधील 29 हजार कोंबड्या व श्री. मेश्राम यांच्या 4 हजार 500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या, असे डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.
पोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा खड्डा तयार करण्यात आला असून त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामुग्री टाकून पक्ष्यांना नष्ट करण्यात येऊन सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमिटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा 90 दिवसासाठी सीलबंद राहील. नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांचे 70 रुपये प्रती पक्षी व खाद्यघटक 20 रुपये प्रती पक्षी असे 90 रुपये प्रती पक्षी असे सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येणार आहे, असेही डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.
मृत पक्ष्यांची, तसेच पक्षीखाद्य, खाद्यघटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी मोहिम पूर्ण करण्यात आली. सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुटपक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे अमरावती एसडीओंच्या आदेशान्वये सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *