नागपूर : बांबूपासून अनेक प्रकारचे साहित्य बनविले जात आहे. अगरबत्तीच्या काड्या, फर्निचर, कापड, बायो इथेनॉल आणि बांधकाम क्षेत्रातही बांबूचा मोठय़ा प्रमाणात होणारा उपयोग लक्षात घेता भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही ३0 हजार कोटींची होऊ शकते असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) तर्फे बांबू तंत्रज्ञान, साहित्य आणि सेवा या विषयावरील आभासी प्रदर्शनाचे उद््घाटन करताना ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. बांबूची विकसनशील प्रक्रिया आता गती घेत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, बांबूच्या आपल्याकडे १७0 जाती आहेत. चीनमध्ये त्या ३६0 आहेत. पण आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने कोणती जात आवश्यक आहे, त्यावर संशोधन करून त्या जातीच्या बांबूची लागवड झाली पाहिजे. बांबूपासून आकर्षक साहित्य बनविले जाते. या साहित्याची मागणी वाढवली तर बांबूची लागवड आणि उत्पादन वाढेल. न्यूज प्रिंटसाठी लागणारा बांबू आपल्याला आयात करावा लागतो. या बांबूची लागवड देशात करून न्यूज प्रिंटची आयात कमी करता येऊ शकते काय, यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उत्तर-पूर्व भारतातील राज्यांमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनविण्याचा उद्योग आहे. या भागातून ४ हजार टन काड्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविल्या जाऊ शकतात. या काड्या बनविताना बांबूपासून निघणार्या कचर्यापासून ‘ऑरगॅनिक कार्बन’ बनविता येतो. हा ऑरगॅनिक कार्बन शेतकर्यांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे शेतकर्याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढल्याचे सिध्द झाले आहे. तसेच बांबूच्या (वेस्ट) कचर्यापासून बायो इथेनॉल बनते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये बायो इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरु होऊ शकतात. इंडियन ऑईल कंपनीने या भागात बायो इथेनॉलचा एक प्रकल्प सुरु केला आहे. गुजरातमध्ये एका कंपनीने बांबू आणि कॉटन मिळून सुंदर कापड तयार केले आहे.
बांबूची अर्थव्यवस्था ३0 हजार कोटींची होईल
Contents hide