मुंबई : पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत काल सायंकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. एकंदर ४ कोटी रोपे लावण्यात येणार आहेत असे वन विभागाने सांगितले.
वृक्ष लागवड करताना पर्यावरण प्रेमी, जंगल प्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा. यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती, जमीन याचा अंदाज घेऊन व जी झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करतांना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे. वृक्षलागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
वृक्ष लागवड करताना पर्यटनाचाही विचार व्हावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरित्या दरी फुलून जाते. त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वनविभागाने करावा. जव्हार, कोल्हापूर, सावंतवाडी, वनविभाग, मेळघाट व अमरावती वन विभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणी करताना नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचाही त्यामध्ये समावेश करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीवर भर द्यावा – मुख्यमंत्री
Contents hide