रायपूर : छत्तीसगड पोलीस विभागात सोमवारी आरक्षक भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच पोलीस विभागात ट्रान्सजेन्डर (किन्नर) व्यक्तींची कॉन्स्टेबल पदावर करण्यात आलेली निवड ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पदावर एकूण ३९५ जणांची निवड करण्यात आलीय. यामध्ये रायपूर विभागात ३१५ पुरुष, ७१ महिला आणि १५ थर्ड जेन्डर अर्थात किन्नरांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी २९ डिसेंबर २0१७ रोजी जाहिरात देण्यात आली होती. २८ जानेवारी ते ११ फेब्रुवरी २0२१ पयर्ंत ही भरती प्रक्रिया सुरू होती. इच्छुकांची शारीरिक पात्रता परीक्षण राजधानी रायपूरमध्ये पार पडली. तर विभाग मुख्यालयात भरती परीक्षा पार पडली. उल्लेखनीय म्हणजे, छत्तीसगड पोलीस विभागाकडून नव्या भरतीसाठी अर्जावर तृतीय लिंग असा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता. दीपिका यादव, साहू, नीशु क्षत्रिय, शिवन्या पटेल, नैना सोरी, सोनिया जंघेल, कृषी तांडी आणि सबुरी यादव अशी या तृतीय लिंग पर्यायाचा वापर करून पोलीस दलात दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे किन्नर समाज आणि मितवा समितीकडून स्वागत करण्यात आले आहे. यासाठी गृहविभागाला धन्यवाद देण्यात आले आहेत.
देशातील पहिली ट्रान्सजेन्डर पोलिस
देशातील पहिली ट्रान्सजेन्डर पोलीस कर्मचारी म्हणून २0१५ साली तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये पृथिका यशिनी हिची निवड झाली होती. याशिवाय राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांतही ट्रान्सजेन्डर पोलीस कार्यरत आहेत. याच वर्षी जानेवारी महिन्यात बिहार सरकारनेही पोलीस दलात किन्नरांच्या सहभागासाठी हिरवा कंदील दिला आहे.