• Wed. Jun 7th, 2023

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते बोर्डीनाला घळभरणी

ByGaurav Prakashan

Mar 19, 2021

अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाल्या असून, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. बोरगाव मोहणा गावालगत बांधकाम सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा शुभारंभ जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते नुकताच झाला.
बोरगाव मोहणा येथील सरपंच अमोल ठाकरे, उपसरपंच गौतम बोदुळे, सौरभ ठाकरे, कार्यकारी जलसंपदा अभियंता सु. गो. राठी, उपविभागीय अभियंता नि. शे. मावळे, उपविभागीय अभियंता प्रणिता गोतमारे, शाखा अभियंता मि. श्री. खंडारे, कंत्राटदार प्रतिनिधी राजेश सरकटे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रकल्पाची मंजूर सुधारित प्रशासकीय मान्यता 515 कोटी 96 लक्ष असून, प्रकल्पावर आतापर्यंत 333 कोटी 73 लक्ष खर्च झाला आहे. प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, बंदनलिकेद्वारे 3 हजार 145 हेक्टर सिंचन कामाची निविदा निश्चितीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाली आहे. त्याशिवाय, वाहिन्यांच्या कामांसाठी 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धरणाची विविध कामे सुरळीत होणार आहेत. प्रकल्पाचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार कामांना तातडीने चालना देऊन विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून कामांतील अडचणी व आवश्यक बाबींची माहिती घेतली व प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. प्रकल्पासाठी विविध मान्यता व निधी प्राप्त झाल्यामुळे अनेक दिवसांपासून थांबलेल्या कामांना चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *