जगणं काय भाव आहे..?

  जे तडफडताहेत
  भाकरीसाठी..
  त्यांना तसंच तडफडू द्यावे..
  जे जंगजंग पछाडताहेत नोकरीसाठी..
  त्यांना तसेच पछाडू द्यावे…
  आपण मात्र इतिहासातले
  निष्क्रिय पात्र
  पुन्हा पुन्हा उगाळत बसावे
  कागदावर..
  वर्तमानपत्रात, फेसबुकवर
  व्हाट्सअपवर
  पेरत जावा देशाभिमान…!
  –‘ते असे म्हणाले होते..
  ते तसे म्हणाले होते..
  सजवत बसावे :कोटेशन’ ने
  घरातले कपाटाचे कपाटं….
  घ्यावे सगळ्यांचे मेंदू ताब्यात
  करावी दिशाभूल..
  कुणाची ‘पेटो ना पेटो’
  आपलीच पेटून घ्यावी चूल…!
  मिरवावे
  नवे तत्त्ववेत्ते म्हणून
  मोबाईल च्या स्क्रीनवरती..
  लावावा तर्क महापुरुषांच्या विचारांचा,
  आपल्या सोयीनुसार…
  बनू नये कुणाचा
  पालन हार
  तरीही गळ्यात पाडून घ्यावेत
  स्तुती सुमनांचे अनेक हार …
  घ्यायला शंका तुमच्यावर
  तसा खूप वाव आहे ..
  गुरुजी,
  गरिबांना एकदा विचाराच,
  आजचं जगणं
  काय भाव आहे..?

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  नंदू वानखडे,

  मुंगळा जि. वाशिम- 9423650468