• Sat. Jun 3rd, 2023

छत्रपतींना असे स्वराज्य अपेक्षित होते काय?

ByGaurav Prakashan

Mar 4, 2021

रयतेचा राजा असे यांना म्हणतात,ते छत्रपती शिवाजी महाराज जर आज आपल्यात असते तर त्यांनी आजच्या देशातील अत्यंत बिकट व वाईट परिस्थितीवर कडाडून प्रहार केला असता. त्यांनी तर तुघलकी केंद्र सरकारच्या पोटातील आतडेच बाहेर काढले असते ,व राज्य सरकारची सुद्धा बोटे छाटली असती. रयतेच्या म्हणजेच जनतेच्या हित व कल्याणासाठी शिवरायांनी सर्वतोपरी प्राधान्य दिले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केले ते दीन-दुबळ्या, गरीब, शेतकरी जनतेसाठी. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी.. पण आजच्या घडीला आपल्या देशातील राज्यकर्ते जनतेच्या हितासाठी नव्हे तर त्यांना देशोधडीला लावण्यासाठी आतुर असल्याचे चित्र आज बघायला मिळत आहे. देशात महागाईचा भस्मासूर आ वासून उभा असून महागाईच्या भडक्यात आज सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. पेट्रोलचे दर शंभराच्या घरात असून फेब्रुवारी महिन्यात गॅस च्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने आता चूल पेटविण्याची वेळ आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले असून सर्वसामन्यांची आर्थिक घडी मोडकळीस निघाली आहे. बेरोजगारी वाढली असून हातावर पोट असणाऱ्या श्रमजीवी वर्गावर उपासमारीची वेळ आली. या सर्व प्रश्नांची सरकारने उकल करावी,मात्र सरकार केवळ जनतेला भ्रमित करून त्यांची दिशाभूल करतांना दिसत आहे.शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य जनता विरोधी धोरणे आखून विद्यमान राज्यकर्ते
त्यांची पिळवणूक करत असून गरीब संपला पाहिजे, हीच कृति सरकारच्या प्रत्येक निर्णयातून दिसून येत आहे. तर राज्य सरकार सुद्धा केवळ सत्तेची फळे चाखण्यातच मश्गुल असून त्यांच्याकडे सुद्धा कुठलाही विकासाचा अजेंडा नसल्याचे दिसत आहे. केवळ नावापुरता विरोध करायचा, व वेळ मारून न्यायचा हीच भूमिका राज्य सरकाने घेतली आहे. देशात व राज्यात कोरोना महामारीने कहर केला असून सर्वत्र लॉकडाउन लावण्यात आला. या लॉकडाऊन ची सर्वात जास्त झळ बसली असेल ती गरीब व सर्वसामान्य घटकांना. कामच बंद असल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. अनेकांचे रोजगार गेले, कोरोनाने बळी घेतले. या काळात सरकारने जनतेची मदत करायला हवी, मात्र सरकार दर दिवसाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नावावर नव्या अधिसूचना जारी करून संचार बंदी, जनताकर्फ्यु सारखे कठोर निर्णय घेउन जनतेवर कारवाई करत आहे. लॉक डाऊन काळात शासकीय कर्मचाऱ्यांचे काम न करता पगार सुरू आहे,डॉक्टरांच्या डिस्पेनसऱ्या सुरू आहे, मोठे उद्दोग सुरू आहे, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, यांचे पगार सुरू आहे, असो चांगली गोष्ट आहे. मात्र हातावर पोट असलेला मजूर, कामगार, रिक्षा चालक, असा श्रमजीवी घटक मात्र घरात उपासमारी सोसून अच्छे दिन अनुभवत आहे. हेच का ते अच्छे दिन? देशवासियांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविनाऱ्या सरकारच्या काळात असे बुरे दिन दिसत आहे. काँग्रेस पार्टीने तर गरिबी हटाओ चा नारा दिला,मात्र भाजपा सरकारच्या काळात अशीच स्थिती राहिल्यास गरीबच मीटल्याशिवाय राहणार नाही.विशेष बाब म्हणचे देशातील आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारे मुंग गिळून बसले आहे. त्यांची अभिव्यक्ती कुठे गेली, का ते धर्मांध झाले की त्यांनी सरकारची लाचारी पत्करली. स्वतःला पुरोगामी व बुद्धिजीवी म्हणणारे साहित्यिक, लेखक, टीकाकार,आंदोलक, शेतकरी नेते,कामगारांचे पुढारी, विचारवंत कुठे गेले,लॉक डाऊन झाले की क्वारंटाईन? देशात महागाईचा भडका उडाला असून लॉकडाऊन ने सर्वसामान्यांचे अर्थचक्र बिघडलेले आहे. असे असतांना महावितरणने वीज ग्राहकांना अवास्तव वीजबिल देऊन त्यांना बील कपातीचा शॉक दिला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कल्याणकारी योजनाचे कामकाज बंद असल्याने लाभार्थी लाभापासून वंचित आहे. या सर्व परिस्थितीला कोरोना जबाबदार आहे की सरकार? कोरोनाचे संकट आणखी दोन वर्षे जाणार नाही असे , काही जाणकारांचे मत आहे, मग तो पर्यंत घरात बसून मरणाची वाट बघावी, की बाहेर पडून कोरोना योध्दा होऊन परिवारासाठी वीर मरण पत्करावे,हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे…
.देशात सर्वत्र कोरोना महामारीची लाट पसरली असतांना लॉकडाऊनच्या आड राहून सरकार सक्तीने नवे नवे कायदे पारित करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहे. तर साठेबाजांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करून ठेवली असून ते लॉकडाऊन चा फायदा घेऊन वस्तु व मालाची ची बेभाव विक्री करन लुट करत आहे. त्यामुळे आता जनता त्रस्त झाली असून लॉकडाउन व सरकार विरोधात जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे. विद्यमान राज्यकर्त्याना
देश कसा चालवावा हे अजूनही समजले नसल्याने सर्वत्र अराजकतेचा हाहाकार माजला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जनता समृद्ध होती, परंतु आता जनता गरिबीच्या अंधकारात खितपत पडून देशोधडीला लागली आहे. त्यामुळे आज जनतेला खरंच सुखी -समृद्ध बनवायचे असेल तर छत्रपती शिवरायांचे प्रमाणे राज्यकारभार चालवावा लागेल तेव्हाच जनतेचे कल्याण होईल.

    राहुल बी. तायडे

    9075055903

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *