• Sat. Sep 23rd, 2023

चौथ्या कसोटीसाठी कुलदीप व उमेश यादवला मिळू शकते संधी..!

ByGaurav Prakashan

Mar 2, 2021

अहमदाबाद : चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी नेमकी संघ निवड कशी करायची, याचा विचार आता सुरू झाला आहे. पण चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्वाचे बदल होऊ शकतात, असे आता दिसत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते आहे.
तिसर्‍या सामन्यात बुमराह आणि सुंदर या दोघांनाही संधी देण्यात आली होती. पण या दोघांना या सामन्यात जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात या दोघांना संघात कायम ठेवण्यात येणार नसल्याचे समजते आहे. बुमराहच्या जागी उमेश यादव हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. कारण उमेशने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची फिटनेस चाचणी पास केली आहे. त्याचबरोबर तो वेगवान गोलंदाजीही करू शकतो, त्यामुळे बुमराहच्या जागी उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सुंदरला जर वगळण्यात आले तर त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. कारण जर सुंदरला संघातून वगळले तर त्याच्याजागी अजून एक फिरकीपटू संघात दाखल होऊ शकतो आणि तोच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सुंदरच्या जागी आता कुलदीपचा विचार संघ व्यवस्थापन चौथ्या कसोटी सामन्यासाठी करत आहे. कुलदीपला दुसर्‍या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला जास्त विकेट्स मिळवता आल्या नव्हत्या. त्यानंतर तिसर्‍या कसोटी सामन्यात कुलदीपला वगळण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुलदीपला संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचीदेखील परीक्षा होणार आहे. कारण यावेळी पुन्हा एकदा जर सामना लवकर संपला तर खेळपट्टी चांगल्या दर्जाची नसल्याच्या शिक्का आयसीसी मारू शकते. त्यानंतर बर्‍याच कालावधीसाठी या मैदानात सामने होणार नाहीत. यावर्षी भारतामध्ये टी-२0 विश्‍वचषक आणि आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर किती दिवस चौथा सामना चालतो, यावर या मैदानाचे भवितव्य अवलंबून असेल.