चांदूर रेल्वे : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह अखेर कौडण्यपूर येथील नदीपात्रात दिनांक ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आढळला.नदीकाठावर मोबाईल सापडल्यामुळे सदर युवकाचा शोध लागला असल्याचे सांगितल्या जात आहे. परंतु आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. चांदूर रेल्वे शहरातील शेंद्रीपुरा येथील रहिवासी असलेला मंगेश लक्ष्मण चौधरी (वय ३२ वर्ष) हा युवक १ मार्चला दुपारी २ वाजतापासून बेपत्ता होता. दरम्यान कुटुंबातील लोकांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन बेपत्ता असल्याची तक्रार हि दिली होती. पण दोन दिवस उलटूनही मंगेश चा थांगपत्ता लागला नाही. परिवारातील सदस्य तसेच मित्रमंडळींच्या वतीने परिसरात दिवसरात्र शोध घेणे सुरु होता. शेवटी मंगळवारी सकाळच्या सुमारास तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील वर्धा नदीकाठावरील अस्थी घाटावर मंगेशचा मोबाईल व इतर काही साहित्य आढळून आले. दरम्यान मोबाईल सापडला असल्याची माहिती नागरिकांनी मंगेशचे नातेवाईक तसेच कुर.्हा पोलिसांना दिली होती. सदर पुराव्यावरून कौंडण्यपूर येथील अस्थी घाट परिसरात मंगेशचा शोध घेणे सुरु होते. दरम्यान कौडण्यपूर येथील विठ्ठल कुरवाडे, अभिमान बावणे, व रुख्मिणी सहकार्य मंडळाचे सर्व सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश देऊळकर यांनी कुर्हा पोलीस व मंगेशच्या नातेवाईकांच्या संमतीने नदीपात्रात बुधवारी शोधकार्य सुरु केले. तब्बल २ तासानंतर मंगेशचा मृतदेह हा हाती लागला. त्यानंतर सदर मृतदेहाचे शवविच्छेदन तिवसा येथे करण्यात आले. यासंदर्भात पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते व कुर.्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहे.