अमरावती : पंतप्रधान आवास योजनेसह सर्व ग्रामीण व नागरी आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
पालकमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण आवास योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन कामे पूर्णत्वास न्यावीत. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गरजू नागरिकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी विशेष शिबिरे राबविण्यात यावी. या शिबिरांतून आवश्यक तिथे बक्षीसपत्र, रजिस्टर व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिबिराचे नियोजन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करून त्याबाबत योग्य ती माहिती नागरीकांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व इतर योजनांचा सद्य:स्थिती पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. झोपडपट्टी पुनर्विकास, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे अनुदान प्रलंबित आहे, ते त्वरित देण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात बडनेरा, बेनोडा, निंभोरा, नवसारी, तारखेडा, म्हसला, राहाटगाव,अकोली आणि गंभीरपूर येथील भूखंडाची निवड करण्यात आली असून सदनिका बांधकाम सुरू असल्याचे संबंधित अधिका-यांनी यावेळी सांगितले.
घरकुलांच्याकामांना चालना मिळण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत पालकमंत्रीॲड. यशोमती ठाकूर
Contents hide