• Mon. Jun 5th, 2023

गृहमंत्र्यांना महिन्याला १00 कोटी हवे होते…!

ByGaurav Prakashan

Mar 21, 2021

मुंबई : मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १00 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यांच्या लेटरबॉम्बने खळबळ उडाली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १00 कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके असलेली कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *