• Mon. Jun 5th, 2023

गृहमंत्री देशमुखांवरील आरोप गंभीर-पवार -पवार

ByGaurav Prakashan

Mar 22, 2021

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी यांच्या बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात पडसाद उमटत असतानाच अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्यावर भाष्य करत भूमिका मांडली. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. एक-दोन दिवसात गृहमंत्र्यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणे मांडले होते. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितले नाही. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. पत्रकार परिषदेपूर्वीच माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. पवार म्हणाले, उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आले. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकार्‍यांकड चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *