गंगुबाई काठियावाडीच्या अडचणीत वाढ

मुंबई: बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. पण आता हा चित्रपट शीर्षकामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे कामाठीपुरा शहराचे नाव खराब होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे अमीन पटेल यांनी राज्य विधानसभेत या विषयी चर्चा केली आहे. कामाठीपुरा क्षेत्रात बदल झाला आहे. ते आता १९५0च्या दशकात जसे होते तसे आता राहिलेले नाही. तिथल्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत आहेत. चित्रपटाच्या शीर्षकामुळे कामाठीपुरा शहराचे नाव खराब होत आहे. चित्रपटाचे नाव बदलले पाहिजे असे अमीन पटेल म्हणाले.
गंगूबाई काठियावाडी या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेवर आक्षेप घेण्यात आला होता. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी या चुकीच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा दावा कामाठीपुरा येथे राहणार्‍या काही रहिवास्यांनी केला आहे. तसेच कामाठीपुरा की आवाज नावाच्या एका या संघटनेने चित्रपटाविरोधात आवाज उठवला आहे. कामाठीपुराचा इतिहास बदलण्यासाठी येथील लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट येथील वर्तमानवर परिणाम तर करेलच पण भावी पिढीवर देखील याचा प्रभाव पडेल असे ते म्हणाले. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात निर्मात्यांनी कामाठीपुराच्या २00 वर्षाच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट जुलै ३0 रोजी प्रदर्शित होणार आहे. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातून भेटले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!