• Fri. Jun 9th, 2023

कोविड सेंटरमध्ये ‘एसओपी’

ByGaurav Prakashan

Mar 5, 2021

मुंबई : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपयर्ंत एसओपी (मानक कार्यपद्धती) लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.
कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. विनयभंगाचा प्रयत्न होणे, हे देखील वाईट कृत्य असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने ‘एसओपी’ लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली.
औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टर तेथून फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *