• Wed. Jun 7th, 2023

केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या दिग्दर्शकाने मारली बाजी

ByGaurav Prakashan

Mar 7, 2021

मुंबई : भारतात सर्वात मानाच्या समजल्या जाणार्‍या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या स्थलपुराण या चित्रपटाने बाजी मारली आहे. या महोत्सवामध्ये स्थलपुराण चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट आणि भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. अक्षय इंडीकरच्या या कामगिरीमुळे मराठी सिनेमा हा जागतिक सिनेमा म्हणून नावारूपाला येत असल्याने सर्वच स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अक्षयला मिळालेला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट हा मानाचा पुरस्कार आशियातल्या सिनेमांच्या विकासासाठी स्थापित असलेल्या एका जागतिक संस्थेकडून दिला जातो. केरळमध्ये ७0 च्या दशकापासूनच अत्यंत दर्जेदार असे सिनेमे बनत आहेत. मात्र त्याठिकाणी अक्षयच्या मराठमोळ्या स्थलपुराण या चित्रपटाने आपला झेंडा रोवला आहे. पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयने आपल्या भावना व्यक्त करत चित्रपटाचे निर्माते संजय शेट्ये यांचे तसेच स्थलपुराणच्या सर्व टीमचे आभार मानले आहेत. अक्षय इंडीकरला त्याच्या या चित्रपटासाठी यापूर्वीही अनेक मानाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कारदेखील दिग्दर्शक अक्षय इंडीकरला मिळाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

स्थलपुराण या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी, ग्रिफिथ स्कूल आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. उदाहरणार्थ नेमाडे या वेगळ्या धाटणीच्या सिनेमापासून आपल्या कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात करणारा अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र व अनोख्या शैलीमुळे जगभरात नावाजला गेला आहे. उदाहरणार्थ नेमाडेनंतर त्रिज्या व स्थलपुराण हे त्याचे सिनेमे जगभारतल्या अत्यंत प्रतिष्ठित सिनेमहोत्सवात झळकले. स्थलपुराण हा सिनेमा बर्लीन आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात जनरेशन कॉम्पिटिशन या विभागात प्रदश्रीत झाला होता. शिवाय अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्याला नामांकनही मिळाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *