• Mon. Jun 5th, 2023

कारंजात आस्थापनेवर धाड; एका बालकामगाराची मुक्तता

ByGaurav Prakashan

Mar 5, 2021

कारंजा : बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ सुधारणा २0१६ अंतर्गत कृती दलाने ३ मार्च रोजी कारंजा येथील एका आस्थापनेवर धाड टाकून येथे काम करीत असलेल्या एका बालकामगाराची मुक्तता केल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी दिली.
बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी ३ मार्च रोजी कारंजा येथे धाडसत्र घेण्यात आले. तपासणी दरम्यान इंदिरा गांधी चौक येथील न्यू नवाज ट्रेडिंग कंपनी या आस्थापनेत एक बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आल्याने कृती दलाने सदर बालकामगारास मुक्त करून, संबंधित आस्थापनाधारका विरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
धाडसत्र यशस्वी करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे, दुकाने निरीक्षक विनोद जोशी, चाईल्ड लाईनचे समन्वयक अमोल देशपांडे, उप शिक्षणाधिकारी श्री. देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल श्री. सरनाईक यांनी कार्यवाही केली.
बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ सुधारणा २0१६ अंतर्गत कोणत्याही आस्थापनेत बालकामगार सहभाग असल्यास, त्याबाबत कोणताही नागरिक, पोलिस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतो. सदर कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करून घेणार्‍याविरुद्ध कलम १४ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व कोणीही बालकामगार कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री. नालिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *