कडक सॅल्युट मेजर….!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    मेजर !

    आपल्या विभागलेल्या सैन्य तुकड्यांना
    जोडण्यात वेळ घालवू नका, मेजर !
    शत्रूचे सैन्य सीमापार करीत आहे
    ते पहा! त्यांच्या सनातन तोफांचे आवाजही
    आपल्याच दिशेने येत आहे मेजर
    आपण विभागालो आहोत
    निश्चितच विभागालो आहोत
    पण, वाकलो नाही, मेजर !
    छातीच्या बरगड्या आणि पाठीचा कणा
    अजून ताठ आहे, मेजर !
    म्हणून बंदुकीचा दस्ता
    जमिनीला टेकवून विचार करण्यात अर्थ नाही
    आपण हल्ला केलाच पाहिजे
    नाहीतर कुठला क्षण
    आपल्याला पराभवाचे दान देवून जाईल
    याचा नेम नाही, मेजर !
    मेजर! शत्रू गुलामीच्या जळत्या घरात राहण्यापेक्षा
    त्याच्या विरोधात निष्ठेने लढणाऱ्या
    माणसांच्या कहाण्या मी ऐकल्या आहेत, मेजर !
    म्हणून आपल्या पराभवानंतर
    युध्दविराम होईलच
    असं तुम्ही समजू नका
    फक्त , आपल्या शहिदत्वाचे रक्त
    इथल्या मातीला लागू द्या
    म्हणजे झोपडीतला बारुदखाना
    आपोआपच उडेल
    आणि त्यातूनच आपल्या विजयाचा
    नवा इतिहास घडेल !

    – सतेश्वर मोरे

    अमरावती