• Wed. Sep 27th, 2023

उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील

ByGaurav Prakashan

Mar 22, 2021

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या मुद्दा गाजत असताना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी धक्कादायक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १00 कोटी वसूल करून देण्याची मागणी केली होती, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले असून, या मुद्दय़ावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील, असे राज ठाकरे म्हणाले.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला आहे. सिंग यांनी केलेले आरोप आणि अनिल देशमुख यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने करावी अशी मागणी केली. आपण मूळ विषय विसरत आहोत. सुशांत सिंग प्रकरण बाजूला राहिले आणि लोक मूळ विषय विसरून जातो. मुळात मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेले जिलेटीन कुठून आले? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील, असा गौप्यस्फोट राज यांनी केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!