• Sun. May 28th, 2023

आपल्या मातापित्यांच्या लसीकरणासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी

ByGaurav Prakashan

Mar 11, 2021

अमरावती : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणार असून, सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. या लसीकरणाबाबत केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या मातापित्यांचे व कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनीही मोहिम हाती घेऊन अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घेण्याचा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी नवाल यांनी आज जारी केला.नवाल म्हणाले की, लसीकरणाच्या चालू टप्प्यात ६0 वर्षांवरील सर्व आणि सहव्याधी असणा-या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्याबाबत केंद्र शासनानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड-१९ व्यतिरिक्त दुसरी कुठलीही लस घ्यायची असल्यास दोन वेगवेगळ्या लसीत कमीत कमी १४ दिवसाचे अंतर असावे. कोविड-१९ लसिकरणाचे दोन्ही मात्रा एकाच प्रकारच्या घेणे आवश्यक आहे. पहिली मात्रा एका कंपनीची आणि दुसरी मात्रा दुसर्‍या कंपनीची घेऊ नये. उदाहरणार्थ, पहिली मात्रा जर कोव्हॅक्सिन घेतली असेल तर दुसरी मात्रा कोविशील्ड घेता येत नाही, असे मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे. त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम म्हणाले की, ज्या व्यक्तीला कोविड-१९ च्या मात्रेची गंभीर अँलर्जीक रिक्शन आली असेल, लस दिल्यानंतर लगेच किंवा उशीरा अतिगंभीर अँनफालाक्सिक किंवा अँलर्जीक रिक्शन आली असेल किंवा लस, इंजेक्शन, औषधे किंवा अन्नपदार्थामुळे रिक्शन येत असेल अशा व्यक्तींनी लस घेऊ नये. गर्भवती व स्तनदा माता यांना लस देऊ नये कारण या गटात ट्रायल झालेली नाही. त्यामुळे ज्या महिला गर्भवती आहे किंवा त्यांना आपल्या गर्भारपणाची शाश्‍वती नाही त्यांनी लस घेऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत व्यक्ती दुरुस्त झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यानंतर लसीकरण करु शकतो. ज्यांना कोविड-१९आजाराची लक्षणे आहेत, ज्या कोविड-१९ रुग्णांना प्लाज्मा दिला आहे किंवा कोणत्याही इतर आजाराने ग्रस्त रुग्ण रुग्णालयात भरती असून त्याला आय.सी.यु ची गरज असेल किंवा नसेल त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी लसीकरण करता येते, असेही डॉ. निकम यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *