• Sun. May 28th, 2023

आता गॅस दरवाढीचा बोजा

ByGaurav Prakashan

Mar 7, 2021

पेट्रोल, डिझेलच्या वाढत चाललेल्या किंमती महागाईवाढीला निमंत्रण देणार्‍या ठरत आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किंमतीतही वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या सिलिंडर्सच्या किंमती या महिन्यात तिसर्‍यांदा वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर गेली आहे. विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत आज २५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
फेब्रुवारीत तिसर्‍यांदा सिलिंडर महाग झाला. सरकारने चार फेब्रुवारीला घरगुती गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर, १५ फेब्रुवारीला एकाच सिलिंडरच्या किंमतीत ५0 रुपयांची वाढ करण्यात आली. आणि आता ही तिसरी वेळ आहे. याचा अर्थ २५ दिवसांत घरगुती गॅसच्या किंमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली. एक डिसेंबरपासून सिलिंडर दोनशे रुपयांनी महाग झाला. एक डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर ५९४ रुपयांवरून ६४४ रुपयांवर गेले. १ जानेवारीला पुन्हा ५0 रुपयांची वाढ करण्यात आली, त्यानंतर ६४४ रुपये असलेले सिलिंडर ६९४ रुपये करण्यात आले. चार फेब्रुवारीला वाढ झाल्यानंतर त्याची किंमत ६४४ रुपयांवरून ७१९ रुपयांवर गेली आहे. १५ फेब्रुवारीला ही किंमत ७१९ रुपयांवरून ७६९ रुपयांवर गेली आणि २५ फेब्रुवारीला किंमत ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर गेली. डिसेंबरमध्येही दोनदा किंमती वाढवण्यात आल्या. जानेवारीत तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. तथापि, डिसेंबरमध्ये दोनदा ५0-५0 रुपयांची वाढ झाली.

अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच एक फेब्रुवारीला अनुदान विना १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही; परंतु १९ किलो वाणिज्यिक सिलिंडरच्या किंमतीत १९१ रुपयांची वाढ झाली आहे. सरकार १२ सिलिंडरवर अनुदान देते. ग्राहकाला प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानासह किंमत मोजावी लागते. नंतर अनुदानाची रक्कम खात्यावर परत केली जाते. ग्राहकांना यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील, तर त्यांना बाजारभावाने खरेदी करावे लागते. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि अमेरिकी डॉलरच्या विनिमय दरावर अवलंबून असणारी वाढ किंवा घट अवलंबून आहे. या वर्षात पेट्रोल ७.१२ रुपयांनी तर डिझेल ७.४५ रुपयांनी महाग झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *