आठ मार्च….…

  आई..…ऐक ना गं
  आजतरी आहोत ना आपण सुरक्षित
  कोणी करणार तर नाही ना आज आपला शिल भ्रस्ट..…?
  खूप जपून चालते गं रोज रोज मी
  वासनांध त्या नजरेला माझा किंचितही शरीर न दिसू देता
  फार काय तर मुक्तपणे कुठे संचार करत नाही
  तोल सांभाळतेय गं मी माझा
  कोणासोबत बोलताना जास्त हसत पण नाही
  नाही कोणाला मित्र बनवत अन्
  नाही कोणाला शत्रू..…
  जेंव्हापासून कळलंय की आठ मार्च रोजी महिला पूजल्या जातात
  तेंव्हापासून वाटायला लागलं की या तारखेवरच वेळ थांबून जावं आणि माझ्या मनातली भिती संपून जावी..…
  होईल का गं कधीतरी आई असं…
  खूप सारे जण आज आपल्या स्टेटसवर दिसताहेत…
  जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा देताना
  उद्या हेच तरुण माझा घात तर करणार नाही ना….?
  आज सगळ्यांना आपण एक बहीण,आई,काकुंसारख्या दिसत आहोत
  उद्याच त्यांच्या वासनेची भूक मिटवणारी एक वेश्या म्हणून तर दिसणार नाही ना..…?
  मला खूप जगायचं आहे गं
  मनसोक्त फिरायचं आहे
  माझ्या डोळ्यांनी संपूर्ण सृष्टी आनंद साजरा करताना बघायचंय…..
  जगणार ना गं आई मी इथे
  खरंच स्वतंत्र होऊन की,
  तोडेल कोणीतरी माझे लचके आणि टाकून देतील मला या वेशीवर
  निर्वस्त्र करून..…समाजातल्या विकृतीचे प्रदर्शन करत……?
  शब्दसखा-

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  अजय रमेश चव्हाण,

  तरनोळी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ
  मो.८८०५८३६२०७