अमरावती : अमरावती येथील विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, अमरावती विमानतळासाठी ६ कोटी ४५ लक्ष रूपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झाला आहे.जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या अमरावती विमानतळाच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला निधी वितरीत करण्यात येतो. त्यानुसार राज्य शासनाकडून २0२0/२१ या वर्षात विविध विमानतळांसाठी १२८ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. त्यात अमरावती विमानतळासाठी सव्वादोन कोटी रुपए निधी यापूर्वीच वितरीत करण्यात आला. तथापि, विमानतळाची विविध कामे पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री पवार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते.विमानतळाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने विमानतळाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक २0२१/२२ मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती पालकमंत्री ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार शासनाकडून निधी वितरीत करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व त्यानुषंगाने औद्योगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. येथील उद्योग वाढीसाठीही पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा व प्रयत्न होत आहेत. मेक इन महाराष्ट्रअंतर्गत नवे उद्योगही अमरावतीत उभारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध झाल्याने अमरावती विमानतळाचे काम लवकरच गती घेईल. जिल्ह्याच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केली.
अमरावती विमानतळासाठी साडेसहा कोटी
Contents hide