अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना लसीकरण मोहिमेचा विस्तारही होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने ग्रामीण भागातही लसीकरणाला चालना देण्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाकडून कोव्हिड-१९ चे लसीकरणास टप्पानिहाय सुरुवात करण्यात आलेली आहे.
त्यानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. सध्याच्या टप्प्यात ६0 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती व ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र घेऊन येणारे अतिजोखमीच्या आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती यांना लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही याबाबत नुकताच आढावा घेऊन शक्य त्या सर्व ठिकाणी लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटरची उपलब्धता पाहून सध्या पीएचसी स्तरावर आठवड्यातील तीन दिवस किंवा ठराविक दिवस लसीकरण होईल.
मात्र, आवश्यक मनुष्यबळ मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत व लवकरच लसीकरणाचे काम आणखी वेग घेईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी व्यक्त केला. अद्यापपयर्ंत ८५ हजार ३६३ व्यक्तींचे लसीकरण झाले. त्यात ६0वर्षांवरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील सहव्याधी असणा-या व्यक्ती अशा सुमारे ४५ हजारहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे, असेही डॉ. रमणले यांनी सांगितले. ग्रामीण भागात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीनुसार अधिकाधिक व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र ज्येष्ठांच्या नोंदणीला चालना मिळून लसीकरणाला गती मिळण्यासाठी गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचा-यांनी सर्व मान्यवरांशी समन्वय साधून नोंदणी व लसीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे. गावातील सर्व लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी. लसीकरण केंद्रावर रोज किमान शंभर ते दीडशे गावातील सर्व पात्र लाभार्थी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून, पुढील एक ते दीड महिन्यामध्ये लसीकरण पूर्ण केले जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रास्तरावरील लसीकरण संपल्यानंतर उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे येडगे यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात लसीकरणाला वेग
Contents hide