• Mon. Jun 5th, 2023

सेलिब्रेटींनी आधी शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घ्यावे नंतर भूमिका मांडावी

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

मुंबई : सेलिब्रेटींवरती देशाचे आंदोलन चालत नाही. थंडी, पावसासारख्या परिस्थितीत शेतकरी आंदोलनासाठी गाझीपूर सीमेवर बसले आहेत. त्यांच्याबद्दल या सेलिब्रेटिंनी संवेदना व्यक्त केली आहे का? भारतातील जे सेलिब्रेटी ट्विटरवरुन आज बोलत आहेत त्यांना भाजपाने एका लक्झरी बसमध्ये बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरवर नेले पाहिजे आणि हजारो शेतकरी कोणत्या परिस्थितीत तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, राहत आहेत, हे दाखवायला पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भारतातील शेतकरी आंदोलनावर परदेशातील सेलिब्रेटिंनी प्रतिक्रिया देत पाठिंबा दर्शवल्यानंतर त्याविरोधात भारतातील सेलिब्रेटिंनी भारत सरकारच्या सर्मथनार्थ ट्विट केले. यानंतर राऊत यांनी भाष्य केले.
राऊत यांनी भारतातील सेलिब्रेटिंना आधी शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा असा सल्ला दिला आहे. काही मोजके सेलिब्रेटी सोडले तर यातील एका तरी सेलिब्रेटी शेतकर्‍याच्या बाजूने उभा राहिला आहे का? आधी शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घ्या आणि मग आपल्या काय भूमिका मांडायच्या आहेत त्या मांडा. जगभरातील लोकांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. पण देशातील काही प्रमुख लोक त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, कारण ते भीती आणि दहशतीखाली आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
काल मी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली, हे आंदोलन आता पसरत चालले आहे. स्वत:ला सेलिब्रेटी समजणार्‍यांना सेलिब्रेटी कुणी केले? त्यांना राज्यकर्त्यांनी किंवा राजकारण्यांनी सेलिब्रेटी केलेले नाही, तर सामान्य, मध्यमवर्गीय माणसाने, कष्टकर्‍याने, शेतकर्‍यांनी त्यांना डोक्यावर घेतले, सेलिब्रेटी केले. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *