• Tue. Jun 6th, 2023

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी चौघांवर कारवाई

ByGaurav Prakashan

Feb 3, 2021

मुंबई : यवतमाळ जिल्हय़ातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान १२ लहान मुलांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. ही अक्षम्य चूक असून याबाबत अंगणवाडी सेविका व आशा कर्मचार्‍यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असून या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केल्याची माहिती आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्य़ात पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याप्रकरणी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम व वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सीएचओ अमोल गावंडे व आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिओ डोज ऐवजी सॅनिटायजर पाजलेल्या बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
कोपरी कापसी येथील अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्यावर देखील कारवाईचा प्रस्ताव असून तो महिला व बालकल्याण विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास या सर्वांवर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी दिली.
पोलिओ डोज ऐवजी सॅनिटायजर पाजल्याचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सांगितले. घटना घडल्यावर तिसर्‍या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापतींनी रुग्णालयात भेट दिली. तर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १२ बालकांना कसलाही त्रास नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
आरोग्य मंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *