• Wed. Sep 27th, 2023

‘सामाजिक बहिष्कार’ करजगावातील एक कटू सत्य.!

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

हजारो वर्षापासून ची जातीची उच्चनीचता मानणारा भारतीय समाज आणि जातीची ही उतरंड जशीच्या तशी कायम ठेवणारा ग्रामीण समुदाय याला काही माझं करजगाव अपवाद नव्हतं काही बोटावर मोजण्याइतकी घरं सोडली तर, बहुतेक लोक आपल्या जातीचा अतिरेकी अभिमान बाळगायचे पण 1966- 67 च्या दरम्यान माणुसकीचे हक्क नाकारणारी घटना करजगावात घडली ,आणि काही काळासाठी तेथे तणाव निर्माण झाला होता.
मूळ गावात कुणबी बहुसंख्य होते. पण गावगाड्यातील महार, सुतार, माळी, कुंभार, न्हावी, रंगारी, सोनार ,ब्राम्हण यांचेही एक दोन -एक दोन घरे होती. काही काळासाठी येथे कोलाम गोंड-गोवारी परदेशी या जाती-जमाती सुद्धा वास्तव्यास होत्या. नंतर बंजार्यां चे एक एक तांडे येत गेले आणि गाव बंजारा बहुल कधी झाले कळलेच नाही.
त्याचं असं झालं 1956 ला गावातील महारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला होता. आता ते ‘नवबौद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. महारांची त्यावेळी सतरा अठरा घरे होती. पण ते दोन मोहल्ल्यात विभागले होते .बहुतेक महारांनी गावकीची कामे सोडली होती. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागलं होतं. बाबासाहेबांमुळे त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये तसेच मानवी हक्क कळू लागले होते.
उकंडराव चौधरी सरपंच असताना गावात ग्रामपंचायतीच्या पाच विहिरी बांधल्या गेल्या होत्या. तांड्यातील खारोणी विहीर ,चींचे खालची विहीर ,बाजीराव जवकेच्या घराजवळची ,नाल्यातील (महारांची )आणि सी-क्लासचीअशा त्या पाच विहिरी होत्या .बौद्धांची पिण्याच्या पाण्याची विहीर नत्थु पाटलाच्या शेताजवळ नाल्यात होती आणि ती लांब अंतरावर होती. पण वापराच्या पाण्यासाठी गावातील विहिरी जवळच्या होत्या. तांड्यात रस्त्याच्या कडेला खारोणी विहीर होती. पण बरडावरच्या छोट्या तळ्यात पाणी आल्याशिवाय त्या विहिरीत पाणीच येत नसे. सहा महिने भरलेली आणि सहा महिने कोरडी अशी तिची गत होती.
1966 चा जुलै महिना होता .गावातील बहुतेक पेरणी आटोपली होती. चींचे खालच्या विहिरीला पाणी आले होते .पण त्या विहिरीला गावातील लोक महारांना हात लावू देत नव्हते. तेव्हा राधाबाई कृष्णाजी वरघट ,जनाबाई मरीभान बरडे, कलाबाई सिताराम बरडे, धुरपताबाई बळीराम बरडे, सायंकाबाई लक्ष्मण वरघट, यशोदाबाई कान्होजी जाधव या सर्व महिलांनी विहिरीला हात लावण्याचा निर्णय घेतला .आणि आपल्या घरातील दोर बाल्टया, आणी पाण्याचे भांडे घेऊन साऱ्याच नऊ दहा महिला चींचे खालच्या विहिरीवर गेल्यात. राधाबाई पहिल्यांदा विहिरीवर चढली .इतर महिलांनी सुद्धा आपल्या बकेटी विहिरीत सोडल्या. पाणी ओढायच्या आतच हिरामण सुतार आणि शेको भाऊ उडाखे पुढे आले.
शेको आपल्या पहाडी आवाजात रागाने ओरडला. “येऽऽपोरी हे काय करत आहात तुम्ही ?”
“दिसत नाही का तुले” यशोदाबाई म्हणाली .
“तुमच्ं हे बरोबर नाही !””हिरामण बोलला. “काय बरोबर नाही?”राधु रागाने विचारू लागली.
“तुम्ही आमच्या विहिरीला हात लावला”शेको फुत्कारला.
“आमच्या विहिरीला हातच काऊन लावला ?”.हिरामण तावातावाने जाब विचारू लागला .
“तुमची म्हणजे तुया बापाची आहे का?” राधु कडाडली
“ए ऽऽपोरी तोंड सांभाळून बोल” शेको ओरडला.” विहीर सरकारी आहे सगळ्या गावकऱ्यांची आहे आमची आहे” यशोदा बोलली.
“नाल्यात तुमची विहीर आहे. आमची विहीर बाटवल्याचे परिणाम भोगा लागनं तुम्हाले”. हिरामण धमकी च्या सुरात बोलला.
” ही विहीर ग्रामपंचायतीची आहे .म्हणजे सरकारी आहे .तुम्हाले जसा पाणी वापराचा अधिकार आहे तसाच आमाले पण आहे”. बहुतेक सर्वच महिला आता तावातावाने बोलायला लागल्या होत्या. आपल्याअस्तीनीतलं शिव्याचं खास हत्यार त्यांनी बाहेर काढलं होतं. वादावादीतच त्यांनी विहिरीतून पाणी काढलं व घरी घेऊन गेल्यात. असाच काहीसा प्रकार “जनार्धन धवने आणि त्यांचे चुलते भिवा संभु यानी सुध्दा तुळशीवाल्या विहिरीवर सत्याग्रहाचा प्रयत्न केला असता त्यांना दावडा चिमणाने रोखले होते. ”
तिकडे गावात मात्र काय गहजब झाला. ताबडतोब ही वार्ता गावभर पसरली की महारनीनी आपली विहीर बाटवली. गावातील सारे एक झाले. उकंडराव चौधरी यांच्या घरी मिटींग झाली. लक्ष्मण हिरवे, नत्थू पाटील, बळवंत पाटील,शंकर चिपडे, विश्वनाथ ठाकरे ,रामक्रृष्ण राऊत, सारेच पाटील नेते या बैठकीला आवर्जून हजर होते. गेल्या दहा वर्षात महार जरा जास्तच माजलेत आता त्यांना धडा शिकवावा लागेल असा एकंदरीत त्या मिटिंगचा सुर होता आणि तेथेच एक भयानक अन्यायकारक निर्णय घेण्यात आला. पाटलांनी महारावर बहिष्काराचे हत्यार उपसले. महारांना यापुढे कोणी कामाला लावायचे नाही .त्यांना दुकानात सामान द्यायचे नाही. चक्कीवर दळून द्यायचे नाही.त्यांच्याशी कोणताच व्यवहार करायचा नाही .
आता मात्र सारेच महार हवालदिल झाले होते. त्यांची हातावर पोटं होती. पण हातालाच काम नव्हतं. घरची होती नव्हती ज्वारी बाया घरीच जात्यावर दळायच्या कारण चक्कीवर त्यांना दळूनही मिळत नव्हतं .अक्षरशः चुली विझायची वेळ आली होती. लेकरा बाळा वर उपासमारीची पाळी आली होती. तेव्हा ते खोपडी, भांडेगाव ,मानकोपरा, चिखली, तेलगव्हाण,आणि किन्ही असे परगावी कामाला जाऊ लागले. तिकडेच मजुरीचे धान्य घेऊन तिकडूनच दळूनही आणत. तसेच तिकडूनच किराणा सुद्धा आणत. पण जातीश्रेष्ठतेने पछाडलेल्या काही लोकांनी परगावी सुद्धा त्यांना काम मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले होते. पण त्यांना तितकसं यश आलं नाही. ही बाब वेगळी.
विहिर प्रकरणाने गावातील वातावरण चांगलेच तापले होते. बौद्धांचा कैवार घेण्यासाठी समता सैनिक दलाचे संघटक बी. के.अगमे यांचे नेतृत्वाखाली 100 पेक्षाही जास्त समता सैनिक दलाचे लोक गावात आले असता चींगला बुडीच्या दुकानाजवळ सावळाबुड्याने दारू पिऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, एका सैनिकाने त्याच्या कानशिलात चांगलीच लगावली होती. बौद्धांनी सुद्धा तालुक्याला जाऊन निवेदन दिलं होतं. काही पोलीस सुद्धा गावात आले होते. त्यांनी गावकर्यां ना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही काही जातीश्रेष्ठतेचा अतिरेकी अभिमान बाळगणार्यांगना हे समतावादी धोरण पटतच नव्हतं.
…पण समतावादी संत श्री सेवादास महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रभाव बंजार्या् वर असल्यामुळे त्यांची बौद्धांना सहानुभूती होती तिकडे गावात मीटिंगावर मीटिंगा व्हायच्या पण तांड्यातलेच गडी चौधर्याा च्या कामाला असल्यामुळे त्या मिटिंग मध्ये काय काय शिजलं हे तांड्यात ताबडतोब समजायचं तेव्हा तांड्यातील जुन्या-जाणत्या लोकांचे मत पडले की “तुम्ही फक्त तुमच्याच जातीची गावात मीटिंग घेता. सगळ्या गावकऱ्यांची मीटिंग घ्या.” शेवटी अशी मीटिंग मारवाड्याच्या आवारात घेण्यात आली या मिटिंग मध्ये गावातील तांड्यातील आणि बौद्ध वस्तीतील बहुतेक लोक उपस्थित होते. या मिटिंग मध्ये असे ठरले “विहीर कोणाच्याही घरची नाही ,विहीर कोणाच्या शेतातली ही नाही, तर ग्रामपंचायतीची आहे. म्हणजेच सर्वांचीच आहे. म्हणून पाणी भरण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. असा न्याय तांड्यातील जुने जाणत्या लोकांशी चर्चा करून महादेव मारवाड्याने दिला. विशेष म्हणजे बंजार्यां ची बौद्धांना सुरुवातीपासूनच सहानुभूती होती .परभ्याबुडा चींगला बुडी त्यांना चोरून आपल्या दुकानातील किराणा सामान द्यायचे. गावातील ही लोकांच्या हळूहळू आपली चूक लक्षात यायला लागली होती. काही दिवसातच सामाजिक बहिष्काराच्या हत्याराची धार बोथट होत जाऊन, करजगावातील परिस्थिती पूर्वपदावर आली. शेवटी माणुसकी चे साधे हक्क मिळविण्याचा प्रयत्न करजगावच्या बौद्धांनी केला होता, आणि त्यामुळेच त्यांच्यावर बहिष्काराचं हत्यार उपसण्यात आलं होतं. हे पण करजगावातील एक कटू सत्य आहे.! मात्र आता संपूर्ण करजगाव गुण्यागोविंदाने नांदत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो..! शेवटी गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    -प्रा रमेश कृष्णाजी वरघट