सातारा : सातारा येथील बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या सहा शिवशाही बस आग लागल्याने जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र शहरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत.
सातारा बस स्थानकात उभ्या करण्यात आलेल्या शिवशाहीच्या सहा बसेसना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर एकामागोमाग सहाही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच सहाही गाड्या जळून खाक झाल्या आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
शिवशाहीच्या सहाही बस सातारा शहर बसस्थानकाच्या समोर उभ्या करण्यात आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजाताच जवळच असणार्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्यांनी तात्काळ धाव घेत अग्निशामक दलाला कळवले आणि हॉटेलमधील कर्मचार्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भयानक होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या सहाही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.
१५ मिनिटानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बसस्थानकात दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत सहाही गाड्या अक्षरक्ष: जळून खाक झाल्या होत्या. पोलिसांनी ही आग कशी लागली यासाठी आजूबाजूचे हॉटेल आणि प्रवाशांकडे चौकशी सुरू केली. मात्र, आगीचे कारण समोर आले नाही. आग लागल्यामुळे बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली.
सातारा बसस्थानकात सहा शिवशाही बस पेटत गेल्या
Contents hide