• Thu. Sep 28th, 2023

संजय राठोड यांच्यासाठी भाजपच्या सरपंचाचा राजीनामा

ByGaurav Prakashan

Feb 18, 2021

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयाच्या फेर्‍यात अडकलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दोन गट पडल्याचे सांगण्यात येतंय. अशातच भाजपच्या सरपंचाने संजय राठोड यांचे सर्मथन करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
पूजा चव्हाण ही तरुणी मुळची बीड जिल्हय़ातील असून तीने पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच, सोशल मीडियावर या प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे बंजारा समाज संजय राठोड यांच्या सर्मथनार्थ पुढे आला आहे. बीड जिल्हय़ातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा या गावच्या सरपंचाने भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण असे या सरपंचाचे नाव असून त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. तसेच, वनमंत्री संजय राठोड यांचे सर्मथनही केले आहे. मी कमल नाथराव चव्हाण, काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचे मला जाणवत आहे, असा आरोप कमल चव्हाण यांनी केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!