• Mon. Sep 25th, 2023

संजय राठोड यांचा राजीनामा मातोश्रीवर

ByGaurav Prakashan

Feb 17, 2021

जळगाव : वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घेतले जात असल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मातोश्रीवर पाठविला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणार्‍या काळात या प्रकरणाच्या चौकशीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला आताच माहिती मिळाली, असेही पाटील यांनी सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते? त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात काय निष्पन्न होते, ते पाहणे महत्त्वाचे असेल. तपासाआधीच आपण कोणाला शिक्षा करू शकत नाही. तपासात जर काही निष्पन्न झाले तर मीच नव्हे तर कुणालाही बोलण्याची गरज राहणार नाही. आपोआप गुन्हा दाखल होईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वतरुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!