• Fri. Jun 9th, 2023

शेतकरी आंदोलन; राज्यसभेत गदारोळ

ByGaurav Prakashan

Feb 3, 2021

नवी दिल्ली : निर्धारित कामकाज स्थगित करून, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी आज राज्यसभेत सभापतींकडून मान्य न करण्यात आल्याने काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, राजद, द्रमुक इत्यादी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. या विरोधी पक्षांनी तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली होती. मात्र, सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही मागणी अमान्य केली. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात उद्या चर्चा होईल, तेव्हा शेतकरी आंदोलनावर सदस्य आपले मुद्दे मांडू शकतात, असे नायडू यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चेसाठी त्यांना नियम २६७ अंतर्गत विरोधी नेते गुलामनबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदु शेखर राय, द्रमुकचे तिरूची शिवा, डाव्या पक्षाच ई करीम आणि विनय विश्‍वमसह अनेक सदस्यांची नोटीस मिळाली असल्याचे सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती नायडू यांनी सांगितले. विरोधी पक्षांच्या सदस्यांची मागणी अमान्य करत, उद्या राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेवेळी सदस्य आपले म्हणणे मांडू शकतात. शेतकरी व सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या होत आहेत. असे यावेळी सभापती नायडू यांनी सांगितले. नायडू यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरूवातीस केलेल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज चर्चा सुरू होईल आणि वरिष्ठ सभागृहात ही चर्चा उद्या(बुधवार) होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *