• Thu. Sep 28th, 2023

शिवरायांचे तेज जगात पसरविणार – मुख्यमंत्री

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

पुणे : छत्रपती शिवाजी महाजांच्या जयंतीनिमित्ताने किल्ले शिवनेरी दूमदूमन गेला. ढोल ताशांचा आवाजाने परिसरात उत्साह संचारला.. गगनभेदी घोषणा आणि सळसळणार्‍या उत्साहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा आहे. शिवरायांची कीर्ती आणि तेज जगभरात पोहोचवण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सगळं ठिक आहे, फक्त तोंडावर मास्क आहे. या भूमीत.. या मातीत हे तेज जन्माला आले, त्याच मातीतील आपण लेकरं आहोत. छत्रपतींनी ज्या लढाया केल्या. जो स्वराज्यावर चालून आला, त्याची विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता तसं युद्ध नसलं तरी करोनाबरोबर आपले युद्ध सुरू आहे. या युद्धात मास्क ही ढाल आहे. अनेक राजे झाले. अनेक लढाया झाल्या.. पण छत्रपतींचं वेगळेपण काय तर युद्ध जिंकण्यासाठी जी जिगर आणि प्रेरणा लागते ती शिवाजी महाराजांनी दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान माता जिजाऊ व शिवरायांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होतच राहते. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे. आपली कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या हाती ढाल तलवारी आज नसल्या तरी करोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. कोरोनाशी लढतांना छत्रपतींकडून प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. राजकारण बाजुला पण, आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!